टूर म्हणजे काय? हा शब्द भटक्या व्यक्तींच्या शब्दकोषात नसतोच या बाबतीत माझंही असंच आहे. हल्लीच माझ्या मित्राने मला सहलीला येण्याचा आग्रह केला. माझ्या नकळत रेल्वेची तिकीटं घेवून आला. मी सहल म्हणून कधीच येणार नाही हे त्याला माहित होतं. तो मला म्हणाला, मला माहित आहे, तुझ्यासारख्या भटक्या माणसासाठी सहल ही नेहमीचीच आहे. पण, तू सहल म्हणून नको येऊस. माझ्या घरातील मंडळीना माझ्या वडिलांपर्यंत पोहचवण्यासाठी तरी येशील? माझी सोबत म्हणून! त्याने माझ्याजवळ एवढी विनवणी केली तेव्हा मीही त्याला जास्त ताटकळत ठेवलं नाही आणि ऐन वेळेस दुसरा जाण्यास कोण मिळणार! तेव्हा मी तयार झालो. कुठेतरी दूरवरच्या प्रवासाला जाणार, नविन अनुभव, नवी माणस सारंकाही नविन घडणार होतं. डोळ्यांसमोर नविन स्वप्न रंगत होती, अशा अवस्थेत मला झोप लागणं कठीण होतं आणि काही क्षणात बेताने उठण्याऐवजी नेमकी मला झोप लागली. मग कसंबसं धडपडत उठलो, सगळी तयारी केली. बॅग आदल्या रात्रीच भरून ठेवली होती. आम्ही घरातून निघालो तेव्हा चारजण होतो. बांद्रा टर्मिनलवर गेल्यावर मला कळलं, अजून घराचे चार वासे यायचे आहेत. सकाळी ११.३० ची बांद्रा कालका मेल होती. चादरी, ब्लॅकेट, भांडी, कपडे, खोटं सौंदर्य खुलवून आणणाऱ्या बाजारातल्या लाली पावडरींची दोन बॅगा अशी ८-१० बोचकी घेवून आम्ही १० च्या सुमारास स्टेशनवर पोहचलो. दुसरीकडून येणारी इतर चार मंडळीही अर्ध्या पाऊण तासात आली. त्यांच्या जवळही ७-८ बोचकी होती. एकंदर मिळून १५-१६ बोचकी झाली. माझ्यासाठी सहलीच्या नविन अनुभवाची सुरूवात इथूनच झाली. मी विचार करत होतो ही एवढी बोचकी चढवायची कोणी आणि उतरवायची कोणी स्टेशनपर्यंत? माणसं होती पण प्रश्न होता नंतरचा. माझ्या सामानाची मला पर्वा नव्हती. माझ्या बॅगेत होतंच काय, एक जोडी कपडे, एक लंगोटी, एक टूथब्रश, एक टोवेल आणि एक पुस्तक ही माझी प्रोपर्टी. आपण मुंबईहून सहलीसाठी १५ दिवस म्हणून बाहेरगावी जातो तेव्हा इतकं काही सामान घेवून जातो की तिथे वस्ती करायची आहे, तिथे या सगळ्यांचा दुष्काळच असावा. पण तुम्ही एखाद्या परप्रांतीयाकडे पहा, तो येताना खांद्याला मळकट टोवेल लावून येतो आणि जाताना मात्र त्याच्यात नोटांची बंडलं घेवून जातो आणि पुन्हा येतो तो आपल्या कुटुंबाला घेवूनच, मुंबईकर म्हणून... आणि आपण मात्र आपल्याजवळ असलेला एकूण एक रुपया संपवून परततो. आगऱ्याचा पैठा, मथुऱ्याचा पेढा, दिल्लीचा महशूर पुलाव, कुल्लुची शाल, पंजाबचे सुती कापड आणि काश्मिरचे उबदार स्वेटर्स. मलाही वाटतं परप्रांतीयांच्या गावी जाऊन अशीच लुटमार करावी आणि या परप्रांतीयांनी आपली नेलेली नोटांची बंडलं परत आणावीत हा झाला व्यवहार. एक विरंगुळा म्हणून आपण तिथे जाऊन काहीच करत नाही.
विचार करता करता ११.३० झाले. मेलचा भोंगा वाजला आणि आमच्या रमणीय प्रवासाला सुरूवात झाली. पहिल्यांदा मला वाटलं, आठ माणसं डब्यात अगदी धुमाकूळ घालू पण तसं काही झालं नाही. प्रवास सुरु होताच सर्वांच्या चेहऱ्यावर १२ वाजले होते. एकाचाही चेहरा प्रसन्न वाटत नव्हता. मनात फक्त कैक विचारांनी धुमाकूळ माजवला होता. असं वाटत होतं यांना कुणी काळ्यापाण्याची सजा सुनावण्यासाठी घेऊन जात आहे. सर्वानी आपआपल्या देवाचे स्मरण केले दोन दिवसाचा प्रवास म्हणून गप्पांना सुरूवात झाली. जसजसा अंधार पडू लागला तसतसे एक एक जण ऑफिस टाईम फुलासारखी मावळू लागली. नंतरचा दिड दिवस असाच गेला. दैवाने माझ्याजवळ पुस्तक होतं म्हणून मला त्याची सोबत झाली, नाहीतर तो डब्बा म्हणजे माझ्यासाठी माणसांचा कळप आणि मी म्हणजे एक धनगर. त्या वातावरणात माझा श्वास अगदी कोंडून गेला होता. कसेबसे दोन दिवस उलटले आणि दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळी आम्ही बेताच्या ठिकाणी म्हणजेच कालका १,६८४ कि.मी.चा प्रवास करून पोहचलो. माझ्या मित्राचे वडील तिथे आमची वाट पाहत होते. तेथून आम्हांला १० कि.मी. झारमांजरी या गावात जायचे होते. सामानाच सारं ओझं माझ्यावर, मित्रावर आणि त्याच्या मावस भावावर पडलं होतं. आमच्यात दोन गुलाबाच्या कळ्या होत्या, मित्राच्या बहिणी. त्यांनी आपल्या दोन बाय चारच्या पर्सशिवाय एकाही सामानाला हात लावला नव्हता आणि आपल्या वडीलधारयांनी सामान उचलावं अशी अपेक्षा नव्हती. कसंबसं आम्ही ते सामान ट्रॅक्समध्ये कोंबलं आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात केली. रस्ता गावाकडचा असल्यामुळे खडकाळ. समुद्राचं पाणी जसं. डचमळत असतं तश्या आमच्या पोटातल्या आतड्या डचमळत होत्या. त्यात सीट वाकडी. त्यातली एक गुलाबाची कळी खड्डा आला की सारखी खाली घसरत होती. तिला मी माझ्या हाताचा आधार दिला. माझीही तीच तऱ्हा होती, पण माझी टेकनीक उपयोगात येत होती. त्यात त्याच्या वडिलांच्या सिगरेटचा धूर, उलटी आणणारा गुटख्याचा वास, ड्रायव्हरची वाकडी तिकडी होणारी स्टेअरिंग आजुबाजुला ओस पडलेली गावं या सगळ्यांनी माझ्या मेंदूला मुंग्या आणल्या होत्या. काय करावं काहीच सुचत नव्हतं म्हणून मीच कसलेतरी विनोद करून वेळ काढत होतो. तासाभरात आम्ही त्याच्या वडिलांच्या राहत्या ठिकाणी झारमांजरीला पोहचलो. आम्ही सामान रूममध्ये टाकलं. मित्राच्या आईने लगेचच चहा टाकला. अंधार फार झाला होता. अंगात इतका मुरगळा होता की झोपेतून उठल्यावर चहा घेतात माहित होतं, आम्ही चहा घेवून झोपलो. दुसऱ्या दिवसाची पहाट उजाडली. झोपण्याची जागा बदलली होती म्हणून आम्ही लवकरच उठलो होतो. तोंड धुण्यासाठी पाणी घेतलं. चुळ भरण्यासाठी तोंडात पाणी घेतलं तेही अगदी मचूळ होतं. कसंबसं अंगावर पाणी ओतलं आणि एकदाचा न्याहरीला बसलो. भुकेने आतड्या चावत होत्या पण आपण मराठी माणसं खारी, बटर, पावाच्या पलीकडे न जाणारी. आपल्याला कुठून मिळणार सकाळ सकाळ सॅडवीच, ज्युस, दुध वैगरे असो, मध्यमवर्गीयांमध्ये चालतं.
सुरुवातीचे पाच-सहा दिवस आमचे असेच निघून गेले. कोकणाकडचा अनुभव होता पण ही गावं म्हणजे पहाडी प्रदेशातील कमीत कमी झाडं आणि जास्तीत जास्त दगड असणारी. औद्योगिकरणाच्या दृष्टीकोनाने इथे बरीच प्रगती झाल्याने आजूबाजूला मोठमोठे कारखाने त्यामुळे तेथील जागेचाही भाव वधारला होता, रस्त्यावर भरधाव घेणारे ट्रक, ट्रॅक्टर, खासगी वाहनांमुळे सबंध वातावरणात धुळ पसरली होती. जणू धुकंच पसरलं आहे. बाहेर फिरण्यासारखं तिथे काहीच नव्हतं. रात्रीच्या वेळेत टिमटिमणारे कारखान्यांचे दिवे, वाहनांचा आवाज, मधूनच एखादा चमकणारा काजवा. यांच्या शिवाय चार-पाच दिवस मी काहीच अनुभवलं नाही. दोन वेळ खाणे, गप्पा मारणं आणि झोपणं यापलीकडे आम्ही काहीच केलं नाही. मला एकही कविता सुचली नाही की एखाद्या विषयावर लेखसुद्धा लिहावासा वाटला नाही. त्यावेळेस कोकणाकडची आठवण फार येत होती. भला मोठा समुद्री किनारा, आभाळाशी सबंध जोडणारी नारळाची झाडं, आंब्याच्या बागा, अथांग समुद्र, वाळून दुरवर पसरलेली सुरुची झाडं, सळसळणारा वारा, एका मागोमाग धावणाऱ्या समुद्राच्या लाटा, हिर्यांप्रमाणे रात्री आकाशात चमकणारे तारे, असंख्य काजव्यांचा थवा, रातकिड्यांचा आवाज, पहाटे होणारा पक्षांचा किलबिलाट, मन मोहून टाकणारे निसर्गरम्य देखावे यांच्यात गुंतून गेल्यावर कधीच यांच्या सानिध्यातून बाहेर पडू नये असं वाटतं. सहज एखाद्या झाडाखाली बसून लेख अन् कविता सुचतात पण या इथे असं काहीच नव्हतं. रखरखतं ऊन, सबंध वातावरणात पसरलेली धुळ, माझं मन इथे अगदी निरसून गेलं होतं. इथली माणसं गुरांसारखी जगणारी, निस्तेज, सौंदर्यपणा हरवून बसलेली, यात माझा जीव अगदी कोंडून गेला होता.
माझ्या मित्राच्या वडिलांनी काही दिवसांची सुट्टी काढून आम्हांला प्रेक्षणीय स्थळ दाखवण्याचा बेत आखला. ठिकाण ठरलं "वैष्णोदेवी". प्रवासात लागणाऱ्या सर्व वस्तूंची आम्ही बांधणी केली. ३५० कि.मी. म्हणजे बारा तासांचा प्रवास होता म्हणून रात्री निघण्याचं ठरलं. सकाळी स्थळ पाहता येतील या बेताने आम्ही ११.३० च्या रात्रीच्या सुमारास आमची खासगी ‘काँलीस’ घराकडून निघाली. पुन्हा रेल्वेतलाच कारावास. तीच शांतता ‘हाताची घडी तोंडावर बोट’. सुरुवातीपासूनच या सहलीत काहीच जीव नव्हता. गाणी ऐकण्याची आवड होती म्हणून मीच ड्रायव्हरला टेप लावायचा आग्रह धरला. शिवाय त्याच्यासोबत रात्र जागायची होती. त्यावेळेसही उलटंच घडलं. त्याच्याजवळ त्याच्याच भाषेतील (पंजाबी) गाण्याच्या कॅसेट होत्या. बरीच शोधाशोध करून एक हिंदी गाण्याची कॅसेट सापडली ‘आशिकी’ ची. मला थोडसं हायस वाटलं पण नंतर त्याचे परिणाम डोक्यावर होवू लागले. सारखी तीच तीच गाणी ऐकून ती तोंडपाठ होऊ लागली. शेवटी कंटाळून ती बंद करण्याच्या पंथावर आलो. अजून बराच वेळ निघायचा होता. गाडीतील इतर मंडळी झोपेतच होती. गाडी आपला रस्ता कापत चालली होती. ड्रायव्हर आपले डोळे चोळत होता. बहुतेक त्याची झोप पुरी झाली नसावी. त्यातूनच त्याच्या डोळ्यावर समोरून येणाऱ्या वाहनांचा प्रकाश त्याला डोळे मिटायला लावत होता आणि माझी नजर त्याच्या डोळ्यांकडे. खिडकीतून सहज बाजूला पाहिलं, काळोख सरत होता, पहाट होतेय असं जाणवत होतं. काही वेळात आजूबाजूचा परिसर अगदी स्पष्ट दिसु लागला. पहाडाला विळखे घालत जाणारी आमची काँलीस आणि खोलवर दिसणाऱ्या दऱ्या, डोळे अगदी ताटवत होत्या. मधूनच कोणीतरी पिशवीत तोंड घालून हॉरर सिनेमाचा आवाज काढत होतं. तर कोणी गाडी थांबवून आपल्या भावना व्यक्त करीत होते. असो, प्रवासात होतंच असं. आम्ही जम्मू-काश्मिरची हद्द पार केली होती. पूर्ण परिसर सैन्याने वेढलेला होता. रस्त्याच्या कडेने उभे असणारे सैनिक, सुरक्षतेसाठी ठिकठिकाणी चालू असणारी तपासणी हे सर्व न्याहाळत असताना मधूनच ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली, तशी मागे झोपलेल्यांना जाग आली. काय झालं कळायला मार्ग नव्हता. खाली उतरून पाहतोय तर टायर पंक्चर झाला होता. आमच्या प्रवासातला हा पहिला अडथळा. मी ड्रायव्हरला टायर बदलण्यास मदत केली तोवर गाडीतली मंडळींनी चहापाणी घेतला. समजू शकतो खाल्लेलं सगळं बाहेर आल्यामुळे आतड्या सुकल्या असतील. सगळेच भीत-भीत खात होते मधेच ढवळू नये, पुढे अजून उमासा न यावा म्हणून. पंधरा-वीस मिनिटात आमचा टायर फिट झाला. पुन्हा प्रवासाला सुरूवात झाली.
काही वेळात आम्ही वैष्णोदेवीला पोहचणारही होतो तितक्यात आमची गाडी सुरक्षा रक्षकांनी अडवली. त्यांना विनवणी करण्यात आमचा अर्धा तास निघून गेला. शिवाय दोनशे रुपये फाईन भरावा लागला. ड्रायव्हरही आमचा तितकासा अनुभवी नव्हता. पैसे मिळाल्यावर रक्षकांनी आम्हांला जाण्याची परवानगी दिली. हा प्रवासातील दुसरा अडथळा. तिथून निघाल्यावर आम्ही थेट हॉटेलपाशीच पोहचलो. रूम बुक केला, सामान रुममध्ये ठेवलं, थोडे फ्रेश झालो. देवीच्या देवस्थानापर्यंतची थोडीशी माहिती मिळवली. आधी वाटलं होतं आजूबाजुची दोन तीन ठिकाणही हात लागल्या होऊन जातील. पण या स्त्रियांच्या तयारीपुढे भारताच्या स्वातंत्र्याची पन्नास वर्षेही अपुरी पडतील. आम्हांला निघायला थोडा उशीरच झाला. आम्ही देवीच्या पायथ्याशी पोहचलो. तेथील सुरक्षाव्यवस्था पाहण्यासारखी होती. पैशाशिवाय कोणतीही वस्तू जवळ बाळगू नये त्याची सक्त मनाई होती. चामड्याच्या वस्तू, पेन, गोळ्या, सिगारेट, गुटखा, फणी इ. या झाल्या पायथ्याशी न बाळगण्याच्या वस्तू. तेथे आमची तपासणी झाली आणि आम्ही पुढे निघून गेलो. मागे माझ्या मित्राचे वडील राहिले होते. त्यांच्या खिश्यातील लायटर, गुटखा, सिगारेट काढून घेण्यात आले. व्यसनी माणसाला त्याच्या नेहमीच्या गोष्टींची लहर आली की राहवत नाही हे मला माहित होतं. पण मी तिथे काहीच करू शकलो नाही. अर्धा किलोमीटर चालून गेल्यावर एका खिडकीवर यात्रा पास लागतो हे आम्हांला माहित नव्हतं. मी त्वरित त्याची माहिती मिळवली. तो मिळवण्यासाठी मला पुन्हा आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो तेथे जावं लागलं. तिथेच माझा एक, दिड तास खर्च झाला. आम्ही त्या पासवर आमच्या माणसांची नोंद करून घेतली आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात केली. बरंच अंतर चालायचं होतं म्हणून प्रत्येकजण स्वतंत्र चालत होता.
मी आणि माझा मित्र काही अंतर पुढे निघून गेलो आणि त्याच वेळेत माझ्या मित्राच्या आईबरोबर अपघात घडला. तिला म्हणे एका घोड्याने लाथ मारली. त्यातच त्याच्या आईच्या हाताचं हाड मोडलं. हे सारं कसं घडलं हे पहायला आम्ही दोघेही नव्हतो. आम्ही त्यांची वाट पाहत विश्रांतीगृहात बसलो होतो. काही अंतरावरून आम्हांला तिच्या हाताला बांधलेलं बँडेज दिसलं. आम्ही दोघंही वेळ न लावता तिच्या जवळ पोहचलो. घटनेबाबत विचारपुस केली. घोडेवाला कुठंय विचारलं तर तो पळून गेला असं समजलं. हा होता आमच्या प्रवासातला तिसरा अडथळा. त्याच्या आईच्या असाह्य वेदना बघुन क्षणभर मला वाटलं होतं, तेथील प्रत्येक घोडेवाल्याला पकडून घोड्याच्या मागे उभं करून घोड्यास सांगावं, "घाल याच्या लाथ"! तेव्हा तेथील सर्व घोडेवाल्यांच्या लक्षात आलं असतं आपल्या निष्काळजीपणामुळे एखाद्याला किती वेदना सहन कराव्या लागतात त्या. त्याच्या वडिलांनी तेथूनच परतण्याचा विचार केला पण त्याच्या आईने मुलाचं मन मोडू नये म्हणून त्या वेदना कशा सहन केल्या असतील हे ती देवीच जाणो. चौदा किलोमीटर पैकी आम्ही अजून पाच किलो. मी. अंतर ही अजून कापलं नव्हतं. मी आजूबाजूला कुठे दवाखाना आहे का याची माहिती मिळवत होतो. संस्थेचा दवाखाना इथे आहे हे माहितीस आलं पण त्यासाठीही सात-आठ कि.मी. चढून जावं लागणार होतं. पोटात काहीच नसल्यामुळे रस्ता चढण्यास उर्जा मिळत नव्हती. ठिकठिकाणी पाणपोया होत्या पण नुसतं पाणी तरी किती पिणार. पिशवीत खाण्याचे हलके पदार्थ होते पण त्या माउलीच्या चेहऱ्याकडे पाहून तेही खावसं वाटत नव्हतं, पण दवाखान्यापर्यंत मला लवकरात लवकर पोहचायचं असेल तर ते खाणं गरजेचं होतं. नाहीतर मीच कुठेतरी मिरगी येऊन पडलो तर आणखीनच त्रास वाढायचा. थोडंस फरसाण मी पोटात ढकललं वर पोटभर पाणी प्यायलो आणि पुढच्या मार्गाला लागलो. वाटेतच माझ्या डोक्यात एक गोष्ट खटकली. मंदिराकडे जाण्यासाठी दोन मार्ग होते, एक वळणा-वळणाची पाऊलवाट आणि दुसरी पायऱ्या पायऱ्यांची वाट. मी तिथेच उभा राहून थोडंस निरीक्षण केलं. जिथे पायी चालुन आणि चढून कमी अंतर कापता येईल असा मार्ग मी शोधायचो. जो मार्ग कमी वेळाचा वाटेल तो मार्ग मी पुन्हा उतरून खाली यायचो आणि मागे राहिलेल्यांना सूचित करायचो या मार्गाने या, तेवढाच वेळ वाचेल. मी हे सर्व मंदिरात लवकर पोहचण्याच्या दुष्टीकोनातून करत नव्हतो तर दवाखान्यात लवकर पोहचण्यासाठी! त्यावेळेस मला देवीच्या मंदिराचं भानच नव्हतं, डोळ्यांसमोर दिसत होता तो दवाखाना.
अंधार पडत आला होता. मी माझा चालण्याचा वेग वाढवला आणि अर्ध्या पाऊण तासाने मी दवाखान्यापर्यंत पोहचलो. दवाख्यान्यात शिरताच समोरच डॉक्टरांची कॅबिन होती. दरवाजा उघडून आत पाहतो तर टेबलावर फक्त थेतोस्कोप होता आणि डॉक्टर गायब होता. लगेच मला मुंबईच्या सरकारी दवाखान्यांची आठवण झाली. मी दवाखान्याची प्रत्येक कॅबिन उघडून पाहू लागलो. कुठेच डॉक्टर दिसत नव्हते. माझी ही बिनधास्त करामत पाहून एक गृहस्थ पुढे आला. तो म्हणाला "क्या चाहिये", मी एक नजर त्याच्यावर टाकली. अंगावर चटेरी पटेरी मळका शर्ट, त्याला मॅचींग नसणारी पॅन्ट, पायात सार्वजनिक शौचालयात घालून जाण्याच्या प्लॅस्टिकच्या मळक्या चपला, अंगावर रंगीबेरंगी पण मळलेलं स्वेटर, त्यातून येणारा दुर्गंध, डोक्यावर केसांचा काथ्या. प्रथम त्याला पाहिल्यावर मला वाटलं हा इथला वॉचमन असावा, त्याच्या हातात काठी नव्हती एवढंच. मी त्याला रुबाबात विचारलं ‘डॉक्टर किधर है?’ क्या हुआ? तो म्हणाला. मी त्याला रागाने विचारलं ‘डॉक्टर साहब है क्या?’ क्या हुआ है बाताओ तो सही, तो म्हणाला. मी वेळ वाया न जाण्यासाठी शेवटी म्हणालो, "मेरे चाची के हाथ पर घोडेने लाथ मारी है, तो उसे बहोत दर्द हो रहा है!" लगेच त्याने घोडेवाल्यांची बुराई करण्यास सुरूवात केली. तो मला त्यांची पोथीच वाचून दाखवू लागला. मी लगेच विषय तिथेच संपवून टाकला. त्यानेही त्वरित मला रुग्णास घेऊन येण्यास सांगितलं. तेथून बाहेर निघाल्यावर मी सहज एक नजर दवाखान्यात टाकली. विचार करत होतो या दवाखान्यात एकही वॉंडबॉय नाही, नर्स नाही, कॉट नाही, डॉक्टर जागेवर नाही, असला कसला हा दवाखाना. काही अंतर मी उतरून खाली आलो. वाटेतच आमची मंडळी भेटली. मी त्यांना दवाखाना थोडयाच अंतरावर आहे सांगितलं. सर्वाना थोडंसं हायस वाटलं, पण वेदना काही कमी झाल्या नव्हत्या. कसेबसे आम्ही दवाखान्यापर्यंत पोहचलो. मी मित्राच्या आईला डॉक्टरांच्या कॅबिन मध्ये घेऊन गेलो. पाहतो तर डॉक्टरच्या खुर्चीवर तोच गृहस्थ बसला होता. असेही डॉक्टर असतात हे मला तिथे कळलं. त्याने काकीच्या हाताला बँडेज केलं. काही गोळ्या दिल्या आणि घरच्या डॉक्टरांना पुन्हा हात दाखवण्याचा सल्ला दिला.
पुन्हा आम्ही आमच्या प्रवासाला सुरूवात करण्यापूर्वी काही खाऊन घ्यावं ठरवलं म्हणून एका हॉटेलात शिरलो. आम्ही आपआपल्या आवडीनुसार पदार्थ सांगितले पण आमच्या आवडीपैकी एकही पदार्थ तिथे नव्हता, म्हणून आम्ही दुसऱ्या एका हॉटेलात शिरलो. तिथेही तोच प्रकार. बहुतेक आमच्या आवडीनिवडी त्यांना माहिती नसाव्यात. माहितीतला एकच पदार्थ उरला होता "समोसे". ते तरी खाऊन पोटाला आधार देऊ तर त्यासोबत आलेल्या चटणीलाही चव नाही. कसेबसे सुकेच समोसे पोटात कोंबले आणि त्या भटारखान्यातून बाहेर पडलो. माझ्या सोबत असणाऱ्यांना गुफा पाहण्याची हौस आली, म्हणतात ती पाहण्यासारखी आहे. मला तिच्याबाबत एवढं काही आकर्षण वाटत नव्हतं पण एक मजा म्हणून पहावी नाहीतरी मुंबईमध्ये सबवेशिवाय गुहा आहेच कुठे. काहीतरी नविन पाहण्यास मिळेल म्हणून .... पाहतो तर तिच्यात शिरण्यासाठी सुद्धा प्रवेशपत्र घ्यावं लागतं. ते मोफत असतं. त्यावरचा नंबर पाहिला ७१२. तो पहाटे लागणार होता. आमची अदयाप संध्याकाळच होती. आम्ही गुहेत जाण्याचं टाळलं आणि थेट मंदिरात जाण्याचं ठरवलं. गुहेपासून मंदिर पाच-सहा कि.मी. असावं. धापा टाकत टाकत आम्ही मंदिराच्या पायरीशी आलो. तिथेही रांगेत उभं राहून प्रवेशपत्र घ्यावं लागतं. ते घेऊन आमची काही मंडळी रांगेत उभी राहिली. तिथे प्रत्येकाला लॉकर सुविधा आहे. त्याच्यात आपल्याजवळ असणाऱ्या महागडया वस्तू ठेवता येतात. मोबाईल, घडयाळ, पॉकेट, गॉगल्स, इतर, चपला सुद्धा. पण त्यासाठी दुसऱ्याचा लॉकर रिकामी होईपर्यंत वाट पहावी लागते. आम्हांला ४७ नंबरचा लॉकर मिळाला. आमच्या जवळ असणारं बारीक सारीक महागडं सामान आम्ही त्याच्यात ठेवलं, पैसे सोडून. कारण ते तेथील संस्थानाच्या खिशात घालावे लागतात. आम्ही सगळे एका मागोमाग एक व्यवस्थित रांगेत उभे राहिलो.
अर्ध्या पाऊण तासांनी आम्ही देवीच्या देवळात प्रवेश केला. आमच्या सोबत असणाऱ्या स्त्रियांनी देवीला ओटी आणि नारळ घेतला होता. तिथल्या पुजाऱ्याने त्यातला नारळ फक्त हातातून हिसकावून घेतला आणि एका भुयारात टाकला. कुणालाच कळलं नाही त्या नारळाचं काय झालं. ओटीची पिशवी शेवटपर्यंत तशीच हातात होती. मला वाटतं ते भुयार बहुतेक पूजेच सामान विकणाऱ्यांच्या दुकानात जात असावं. डोक्यावरच्या घंटया कुटत कुटत आम्ही देवीपर्यंत पोहचलो. प्रत्येकजण देवीच्या दर्शनास आतुर झाला होता. भक्तगण हळुवार पाऊले पुढे टाकत देवीचा जयजयकार करत होते. मधेच एका चौथऱ्यावर एक पुजारी बसला होता. तो सर्वाना एका ठिकाणी बोट दाखवून म्हणत "ये है वैष्णो माता". तिथे असणारे सुरक्षा रक्षक अगदी निष्काळजीपणाने भक्तगणांना पुढे ढकलत होते. मीही पुजाऱ्याजवळ आलो. त्या पुजाऱ्याने मला एका दगडावर असणाऱ्या फुलाकडे बोट दाखवलं आणि म्हणाला "ये है वैष्णो देवी". मीही आदराने त्या चौथऱ्याला डोकं टेकवण्यास गेलो तितक्यात एका रक्षकाने मला हाताला धरून पुढे ढकललं. नीट डोकंही टेकू दिलं नाही. क्षणार्धात माझा राग मस्तकात गेला. वाटलं त्याचं डोकं धरून त्या चौथऱ्यावर आपटावं, तेवढंच नारळ फोडल्याचं समाधान मिळालं असतं. नंतर मीच माझ्या रागावर ताबा मिळवला आणि सोबत वडिलधारी माणसंही होती. उगाच नसता व्याप कशाला! पण एक पाहता तिकडच्या संस्थानाविषयी मला फार चिड आली होती. एवढा पैसा खर्च करून, जिवाची ओढाताण करून, वेळात वेळ काढून भक्तगण देवीच्या दर्शनास येतो, त्यांना साधं देवी बघितल्याचं समाधान मिळू नये. अर्ध्या अधिक लोकांनी देवीची प्रतिमाच पाहिलेली नसते. काय अर्थ या देव दर्शनास. निव्वळ वैष्णो देवीच्या ठिकाणी गेल्याचं लोकांना सांगता येण्यासारखं समाधान. एक वेळ मनात विचार आला, यांच्या संस्थानाच्या अधिकाऱ्यांना घेऊन शिर्डीला जावं आणि दाखवावी तेथील सुव्यवस्था. अगदी लांबूनही बाबांचं दर्शन होतं. गाभाऱ्यात जाण्याचीही आवश्यकता नाही. तेच काय मुंबई सारख्या ठिकाणी मुंबादेवी, साईधाम, महालक्ष्मी, सिद्धिविनायक अशा वर्दळीच्या ठिकाणी असणाऱ्या मंदिरांची व्यवस्था अगदी सुरळीत चालू असते आणि इथे चौदा कि.मी. डोंगर वर चढूनही तीस सेकंदही उभं राहून देवीचं दर्शन घेता येत नाही. मी तेव्हाच ठरवलं, पुन्हा इथे येणं नाही. वाटलंच तर तीर्थक्षेत्राची चित्रफीत पहावी, तीही अगदी जवळून.
देवीच्या देवळातून बाहेर पडलो. प्रसाद घेतला आणि ज्या ठिकाणी लॉकर होता त्या ठिकाणी आलो. आम्ही आमचं सामान लॉकरमधून बाहेर काढलं आणि त्याची चावी तेथील अधिकाऱ्याकडे दिली. आता पुन्हा तेवढच अंतर खाली उतरायच होतं. थंड वारा कानात शिरत होता, तस अंग शहारात होतं. वर चढून पाय जड झाले होते, तेच आता खाली उतरताना थरथर कापत होते. पायात काहीच जोर उरला नव्हता. विश्रांतीसाठी आम्ही एका ठिकाणी उभे राहिलो तर काही वेळाने लक्षात आले आमच्यातील एक व्यक्ती कमी आहे, ती म्हणजे आमच्या मित्राची मावशी. आम्हांला वाटलं इथेच शौचालयात गेली असेल किंवा काहीतरी खरेदी करत असेल, पण अर्धा पाऊण तास झाला ही बाई काही परतली नाही. ती ही एकटीच गेलीय आम्ही तिला शोधण्यासाठी पुन्हा मागे फिरलो. जिथे जिथे आम्ही थांबलो होतो, तिथे तिथे पाहिलं. ही कुठेच दिसत नव्हती. सगळे चारी दिशांना शोधून आलेत तरी हिचा पत्ता नाही. ही गेली तरी कुठे आणि ती ही एकटी. कुठेच जाण्यातली नव्हती. डोक्यात नाना शंका कुशंकांनी काहूर माजवलं. आम्ही तिथला एकूण एक कानाकोपरा शोधला, कुठेच सापडली नाही. शिवाय अंगावर दागिने, मंदिरात जातानाच वाचलं होतं चोरांपासून सावध रहा. शिवाय ते ठिकाण दहशतवाद्यांचे सांकेतिक ठिकाण. दोन अडीज तास झाले सर्वांचेच चेहरे रडवेले झाले होते. मावशीला कुठे शोधावं काहीच कळेना. माझ्या मित्राच्या आईला अशा बाबतीत माझ्यावर फार विश्वास होता. तिला सारखं वाटत होतं, मावशीला मी शोधून काढेन. मनातच मी पुटपुटत होतो "मी काय ब्रह्मदेव आहे? तथास्त्तु म्हटल्यावर मावशी लगेचच प्रगट होईल". शेवटी तिने माझ्यावर एवढा विश्वास दाखवला हेच मोठं. मी ही तिला तेवढयाच विश्वासानं उत्तरं दिलं "पुर्ण रात्र इथे काढेन आणि मावशीला शोधून आणेन. थोडा वेळ आम्ही यावर विचार विनिमय केला. मावशीच्या घरी फोन लावून पहायचा का? कारण इथल्या सर्वांचे मोबाईल बंद होते. चूकामुक झाली म्हणून तिने घरी फोन करून तिच्या ठिकाणाबद्दल माहिती ठेवली असणार. एक मन सांगत होतं, नाही तिथे फोन केला तर तिच्या घराची मंडळी काळजीत पडतील. नंतर ठरवलं, आज पहाटे पर्यंत हिला शोधू सकाळी पोलीस चौकीत जाऊ आणि तिच्या नावाची तक्रार नोंदवू. मी पुन्हा मंदिराच्या पायथ्याशी गेलो. तिथे चौकशी केंद्रावर नाव पुकारणी केली आणि आम्ही अमूक अमूक ठिकाणी तुझी वाट पाहत आहोत असे सांगितले. बराच वेळ झाला तरीही मावशी आली नाही. पोटात अन्न नाही, शरीरात त्राण नाही, सगळेच अशक्त जाणवत होते. त्या दोन कळ्या तर आता पूर्ण कोमेजून गेल्या होत्या. त्यात माझ्या मित्राला आणि त्या मावस भावाला चालण्याची सवय नाही. हे दोघंही अगदी मोडकळीस आले होते. त्यांना घोडे करून देणं भाग होतं. त्यात मित्राची मामी तिचीही तीच अवस्था आणि त्याची आई पुन्हा कधीच घोडयावर बसणार नव्हती. त्याच्या वडिलांना घोडयावर बसण्याची आवश्यकता नव्हती. दोन घोडे केले तर चौघे बसू शकत होते. प्रत्येकी १४० रु. एका घोडयाचे २८० रु. आणि घोडयावरून जाणारी माणसं होती पाच. आता एकटयासाठी घोडा करणं भीतीदायक होतं. तो घोडा मिळेल त्या वाटेला जातो. मी घोडयावरून जाणार नव्हतो कारण मला मावशीला शोधायचं होतं तेही चालत. ती कुठेतरी वाट बघत बसली असेल या विचाराने म्हणून मित्राचा भाऊ माझ्या सोबतीला राहिला. आता घोडयावर मामी आणि मामीची मुलगी. दुसऱ्या घोडयावर मित्राची बहिण आणि मित्र, मित्राची बहिण आणि मित्र हे पुढे निघून गेले तोवर मामी घोडयावर चढत होती. जशी मामी घोडयाच्या पाठीवर बसते न बसते तसे घोडयाने आपले पुढचे पाय वर केले. घोडयाच्या या अश्या प्रकारामुळे मामीची घाबरगुंडी उडाली. उतरोऽऽ उतरोऽऽ अशी मामीने घोडेवाल्याला ओरड घातली. मामी खाली उतरली. आता तिच्या मुलीला एकटं कसं पाठवायचं म्हणून मला विचारलं. मी सरळ नकार दिला. मला मावशीला शोधायचय, घोडयावरून पुढे जाऊन काय करू? तेव्हा तिच्या मावस भावाला तिच्या पाठी बसवून पुढे पाठवलं. माझ्या सोबत असणारे काठी टेकत टेकत चालत होते मला त्यांच्या वेगाने चालणं अवघड वाटत होतं. शिवाय अजून १०-११ कि.मी. उतरायचं होतं म्हणून मी त्यांना सांगितलं, "मी पुढे जाऊन मावशीचा शोध घेतो, तुम्ही हळूहळू खाली उतारा" आणि माझ्या पायांनी वेग धरला.
चालता चालता मधूनच वाटत होतं पायच नाहीत मला. एवढा अशक्तपणा जाणवत होता, दिवसभर पोटामध्ये दोन समोसे आणि एक चहा याशिवाय काहीच नव्हतं. पुन्हा जोमाने चालू लागलो. मनातल्या मनात माझ्या गुरुचं नामस्मरण चालू होतं. मला वाटतं त्यामुळेच मी एवढा चाललो असेन. मी रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाविकांमध्ये मावशीला शोधू लागलो, कडेला झोपलेल्या माणसांच्या अंगावरच्या चादरी ओढून पाहू लागलो. तिने नेसलेल्या साडीसारखी दुसरी एखादी स्त्री दिसली कि तिला जाऊन मी थांबवत होतो. तेथील लोकं माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत होते. तिला शोधण्याच्या नादात मी स्वत:ला विसरून गेलो होतो. मला स्वत:चही भान नव्हतं. त्या कुडकुडणाऱ्या थंडीत मी शर्ट काढून खांद्यावर ठेऊन भटकत होतो. मला आतून माझं शरीर अगदी उबदार जाणवत होतं. हे सारं कसं घडत होतं मला अजूनही कळलेलं नाही. दोनदा मला परक्या स्त्रीला पाहून मावशीचा भास झाला. एव्हाना मी पुर्ण डोंगर उतरून खाली आलो होतो. अशक्तपणा, भोवळ, अंगदुखी आता अधिक जाणवू लागली होती. मी औषधाचं दुकान कुठे दिसतं का ते पाहत होतो. अंगदुखीवर एखादी गोळी घेईन आणि कुठेतरी अंग टेकेन असा विचार करत होतो. तेवढयात समोर घोडयावरून उतरताना माझे सोबती नजरेस पडले आणि तिथेच बाजुला औषधाचं दुकानही... मी तिथून एक अंगदुखीवरची गोळी घेतली पण ती अशीच कशी घेणार? पोटात तर काहीच नव्हतं म्हणून एका हॉटेलमध्ये आम्ही चहा बिस्कीट घेतला. मला पुन्हा थोडी तरतरी आली. मी त्यांना विचारलं "तुम्हांला मावशी कुठे दिसली का?" त्यांनी "नाही" सांगितलं. आतातर आम्ही डोंगराच्या पायथ्याशी म्हणजे प्रवेशद्वाराजवळ आलो होतो. आता तिला शोधण्याचे सगळेच मार्ग बंद झाले होते. मी हि मनातल्या मनात पोलीस चौकीच्या पायऱ्या चढत होतो पण मन हार मानायला तयार नव्हतं. मी मित्राला म्हणालो, "तुम्ही मागून या, मी पुढे जातो". ते वैष्णो देवीचं अवाढव्य संगमरवरी नक्षीकाम, वेडया वाकडया कमानी, भोवताली असणारे सैनिक, आजूबाजूला रेंगाळणारा जनसमुदाय, टापांचा आवाज करत जाणारे घोडे, त्यांच्यामागे भुंकणारी कुत्री, मधूनच शिळ घालणारी कोकिळा, रिक्षांचे टरटरणारे सायलेंसर, त्या शांत प्रांत:काळी माणसांचा चाललेला गोंधळ हे सारं मी थकलेल्या शरीराने आणि निद्रानाशेने बारीक झालेल्या डोळ्यांनी अनुभवत होतो. त्या अवस्थेतही मला जिथं पहावं तिथं मावशीच दिसत होती.
एका घुमटाखाली संगमरवरी फरशीवर त्या झोंबणाऱ्या थंडीतही काही माणसं निर्धास्त पडली होती. त्या घुमटाच्या एका आधार स्तंभालगत डोक्याभोवती गुरफटलेला पदर, चेहऱ्यावर रुमाल ओढून, अंग जवळ घेऊन झोपलेली स्त्री त्या अवस्थेतही कोणाचीतरी वाट पाहत आहे असं जाणवत होतं. ती मावशीच असेल असं उत्तर दयायला माझं मन तयार नव्हतं कारण यापूर्वी मला दोनदा तीच असल्याचा भास झाला होता. पण मानवाला दोन मने असतात. एक अंतर्गत मन, दुसरं बहिर्गत मन. एक मन माणसाला होकारार्थ दर्शवत असते आणि दुसरे नकारार्थ दर्शवत असते. एकंदर मानवाचे जीवन चित्रविचित्र अनुभवांनी घेरलेले आहे. एखादा शास्त्रज्ञ हव्या त्या गोष्टींवर, भौतिकतेवर शोध लावू शकतो पण मानवी मनाचा शोध घेणं फार कठीण आहे. त्याच वेळेस माझ्या मनाच्या दुसऱ्या कोपऱ्यातून होकारार्थी प्रतिध्वनी उमटू लागले. अचानक चालुन चालुन थकलेल्या निर्जीव झालेल्या माझ्या पायांमध्ये कुठून ताकत आली देव जाणो, मी जवळ जवळ पन्नास ते पंच्याहत्तर पावलं धावत त्या स्त्रीकडे पोहचलो आणि एकदम ढोपरांवर बसलो. हळूच तिच्या चेहऱ्यावरचा रुमाल काढला आणि क्षणार्धात आनंदलहरी माझ्या हृदयात सामावू लागल्या. त्याच वेळेस मला एका शक्तीची जाण झाली, ती म्हणजे आत्मविश्वासाच्या शक्तीची. मी शेवटपर्यंत हरलो नव्हतो. माझ्या जवळ माझ्या गुरूंच मन:सामर्थ्य होतं, त्याचीच ताकत आणि माझी जिद्द यामुळेच मी मावशीपर्यंत पोहचू शकलो. तोवर माझ्या आवाजातही त्राण उरला नव्हता. मी कोरडया आवाजात मावशीला हाक मारली, पण ती हाक तिच्या कानांपर्यंत पोहचली नसावी म्हणून मी तिचा खांदा धरून हलवू लागलो. एकदम दचकून मावशीला जाग आली. मला पाहताच तिचा चेहरा आनंदाने खुलून आला. तोवर माझे सोबती आले. आम्ही सगळे मावशीच्या जवळ बसून राहिलो. मग तिने आपल्या चुकामुकीची सविस्तर माहिती दिली. मित्राच्या मावसभावाने मागे राहिलेल्या वरिष्ठ मंडळींना मावशी सापडल्याची सूचना दिली. काही वेळाने तेही आले. पुन्हा एकदा सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य लहरी उमटल्या आणि माझ्या मित्राच्या आईला वैष्णोदेवी पावली. पुन्हा आम्ही जसे देवीच्या दर्शनास आलो होतो तसेच थोड्या दुखापती का होईना पण एकत्र परतलो. मी ही त्या पायथ्याशी शेवटचा मनपुर्वक प्रणाम त्या वैष्णोदेवीला केला आणि सरळ मार्गी लागलो.
एक दोन दिवसांनी मी मुंबईला परतलो, तो ही एकटाच. माझ्या ओळखीतल्यांनी मला बरेचसे प्रश्न केले. अरे जाताना चार होतात, येताना एकटाच! बाकीचे तीन हरवले काय? लगेच दुसऱ्याने काय काय खरेदी केलीस? त्याचं पूर्ण होत नाही तोवर तिसऱ्याने काय काय पाहिलेस? हतकुवारी, भैरवाचं मंदिर, देवीची गुफा पाहिलीस का रे? "मंदिराच्या पायऱ्या मोजल्यास? अरे चौदा किलोमीटर वर आहे ते, मग कसा घोडयाने गेलास? त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. वैतागून मनातूनच त्यांना उत्तर दिलं "नाही घोडा माझ्यावरून खाली उतरला होता". काय पाहिलंस विचारतोय "इतके पैसे, वेळ आणि चौदा कि.मी. वर चढून देवीचा दगड पहिला. तोही काळा का पांढरा माहित नाही" तितक्यात चौथा विचारतोय, "मला काय आणलंस"? मी ही त्याला रागानेच उत्तर दिलं, "मी आलोय एवढं पुरे नाही का? कोणा कोणाला काय काय खोटं बोललो होतं हे मलाच आठवत नव्हतं. कसा बसा त्यांच्या तावडीतून सुटून घरी पोहचलो. बॅगेतून कपडे काढून हॅगरला टांगत होतो तेवढयात शर्टाच्या खिशातून चंदेरी तुकडा खाली पडला, पाहतो तर ‘पेन किलर’. तेव्हा हॉटेलमध्ये घ्यायची विसरून गेलो होतो ती आता उपयोगी पडली. थोडा फ्रेश झालो, बॅगेतलं "द दा विंची कोड" घेतलं आणि लॅब्ररीत आलो. लॅब्ररीत पाऊल टाकतो न टाकतो आमच्या लॅब्ररीच्या मॅडमनी एखाद्या शाळेतील मास्तरीण जशी गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्याची हजेरी घेते तशी माझ्यावर रेखायला सुरूवात. आठवडाभर म्हणून सांगून गेला होतास, दोन आठवडयांनी परततोस. तुझ्यामुळे सगळी काम खोळंबलीत. कुठे होतास इतके दिवस? माझा पडलेला चेहरा पाहून ती थोडी नरमली. चल दे ड्रेस पिस कुठेत? मग मी तिला माझ्या सोबत घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती दिली, तोच हा इतिहास! जाताना नविन अनुभव मिळतील याची आस घेऊन गेलो होतो, येताना पेलवता न येण्याइतके घेऊन आलो. म्हणूनच थोडेसे माझे ओझे तुमच्या डोक्यावर टाकतोय त्यासाठी क्षमस्व!
2 comments:
मस्तच लेख ... उत्सुकता अगदी शेवटपर्यंत टिकून होती वाचताना पुढे काय घडणार अजून त्याबद्दल ... :)
Good written think people will think twice before plnan to vaishno devi.....thanks .....
Post a Comment