माझं गाव


निरागस जीवनाची वाटचाल करत असताना विचार करत होतो की, अचानक कुणीतरी यावं अन् आशेचा हाथ द्यावा. विविध कल्पनांनी नटलेल्या दुनियेत प्रेरणेची एकतरी हाक ऐकावीशी वाटत होती. शेतावरच्या झोपडीत राखणीला बसून मी कधीही साकार न होणारी स्वप्न रेखाटत होतो. सुर्य मावळतीच्या दिशेला जात होता. मी घराकडे जायला निघालो. शेताला लागून असलेल्या मार्गावर सरकारी कर्मचाऱ्यांची चार-पाच वाहने उभी असलेली मला दिसली. एकंदर विस ते पंचवीस कर्मचारी अधिकारी होती तीत. त्यातील दोघांकडे तिवईवर असलेले भिंगाचे यंत्र होते आणि दोघे त्यांच्या सांगण्याप्रमाणे लिहीण्याचं काम करत होते. त्यातील तिघेजण शेत मोजणी करत होते. अधिकारांच्या भोवती त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी गावकरी वर्ग जमला होता. मला काही कळेनासं झालं, मी घराकडे धाव घेतली. गावाच्या पारावर काही बायका जमल्या होत्या. कर्मचाऱ्यांची पाहणी झाल्यावर सगळे गावकरी आपापल्या घराकडे यायला निघाले. आमच्या वाडीतील एका व्यक्तीस मी विचारले, काय हो ती माणसे कशासाठी आली होतीत? बारीक आवाजात तो म्हणाला, ‘आपल्या गावातील अर्ध्याअधिक लोकांची शेतं सरकारी खात्यात जाणार आहेत’.

त्याच्या त्या बोलण्याने माझ्या मनात अनेक विचारांनी घर निर्माण केले. एका शेतकऱ्याने शेतात राबता राबता निसर्गाशी जुळविलेलं नातं आता तुटणार या विचारांनी मन थोडं खालावलं. मातीतून मोती उगवण्याची शेतकऱ्याची परंपरा आता बंद पडणार. वाऱ्यावर झुळझुळणारी शेते आता उगवणारच नाहीत, शेतातून खळखळणारा झरा आता वाहणार नाही. गवताच्या पातीवर पाखरे बसतील का? त्यांच्याभोवती फुलपाखरेही बागडणार नाहीत. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचारही करवत नाही. जर का शेतकऱ्याने धान्यच पिकवलं नाही तर त्याने व तुमच्या आमच्या सारख्यांनी खायचं काय?

दुसऱ्याच दिवशी गावातील पंचायतीच्या कार्यालयात सुचना, फलकावर सरकारी जाहीरनामा लावण्यात आला. पंचायतीची व सरकारी अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली. त्यामध्ये शेतजमीनीवर सरकारी कारखाना उभारण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे गावात मुबलक पाणी पुरवठा, वीजनिर्मिती केंद्राकडून वीज पुरवठा, गावातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, गावामध्ये विद्यालये, महाविद्यालये, इस्पितळे व इतर सुखसोयी उपलब्ध होतील असे नमुद करण्यात आले. काही का होईना एकंदर गावाचा विकासच होणार होता. विकासाच्या दृष्टीकोनातून ते ठिकच होतं, पण सुपीक जमिनीवर अश्याप्रकारे जर कारखाने उभारू लागलेत तर ह्यात देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही का? आपला देश अन्नधान्यांची निर्यात कशी काय करणार? कारखाने झाले तर देश प्रगतीपथावर तर पोहचेल पण त्याच्या दुप्पट पटीने प्रदूषणही वाढेल. बेरोजगारांना नोकरी मिळेल पण आरोग्य मिळणार नाही.

शेतजमिनीवर सिमेंट क्रॉक्रीटची भरणी होवून कारखाना उभा राहिला. दिवसभर शेतात राबणारा शेतकरी आता आठ तास काम करून दुपटीने पैसे मिळवू लागला. हळुहळु त्याच्यात आळशी वृत्ती निर्माण होवु लागली. त्याला त्याच्या केलेल्या कष्टांचा विसर पडू लागला. शेतात नांगर ओढणारी त्याची मुलं संगणक हाताळू लागलीत. बैलगाडयांचा प्रवास त्यांना लाजिरवाणा वाटू लागला. मोटार ठेवण्यासाठी गोठाही हटविण्यात आला. कौलारू घरे त्यांना कोंबडयांच्या खुराडयासमान वाटू लागलीत. त्यासाठी बंगला बांधला. निसर्गाशी नातं तर कधीच तुटलं होतं. घराच्या आसपासचा परिसर वायफळ वाटू लागला. लगेचच एका पैसेवाल्या खरीददाऱ्याला विकली. तेथे इमारती उभ्या राहिल्या.

माणसाने आपले रंग दाखवायला सुरूवात केली तर निसर्ग तरी गप्प कसा बसेल? त्यानेही नैसर्गिक आपत्ती आणण्यास सुरूवात केली. कुठे दरड कोसळते, तर कुठे धरणीकंप होतो, कित्येक फुट खोदूनसुद्धा पिण्यास पाणी नाही, तर काही ठिकाणी धरण फुटून गावंच्या गावं वाहून जातात.


काय झालं असेल त्या शेतकऱ्याचं? बंगला गेला वाहून अन् मोटार गेली भंगारमध्ये. पळायला आसपासची जागाही नव्हती आणि अखेर जे धान्य तो स्वत:च्या हातांनी पिकवित होता, ज्याची त्याला कमतरता नव्हती. तेच धान्य त्याला एक निर्वासित पुरग्रस्त म्हणून देण्यात आलीत.

- सुनिल संध्या कांबळी.

No comments: