आधार

देव जीवन देतो पण जगण्याची कला देत नाही. दु:ख देतो पण, निवारण देत नाही. जीवन अंधारमय झाल्यावर कोण आपलं आणि कोण परकं ठरवणं फार कठीण होऊन जातं...

माझं काय चुकतंय म्हणून देव मला ही शिक्षा देतोय? एवढंच की माझं मन खुप हळवं आहे. खरंच मी निष्पाप आहे. त्यावेळी मी एका दगडावर जीव लावून बसले होते; मी पाहिले होते ते मृगजळ होते; भासामागून धावत होते... अगदी बेभान होऊन... आणि जेव्हा मागे वळून पाहिले तेव्हा... माझी सावली देखिल माझी राहिली नव्हती. माझ्या आयुष्यात केलेली ती माझी सर्वात मोठी चूक होती. स्वार्थीपणा हे फक्त दु:खंच देवू शकतं हे आता मला कळून चुकलं होतं... खरंच मला माफ करा... आजही माझं मन तितकच निर्मळ आहे जितकं तुम्ही मला ओळखता. मला या अंधकारात नाही रहायचंय आता... मी निराधार होऊन कोसळून जाईन त्याआधी तुम्ही मला सावरून घ्या... तुम्ही सांभाळून घ्याल ना मला?


खरय तुमचं. आमच्यात संवाद यापूर्वी खूपदा झाला होता, पण दुरूनच. मी त्याला कधीही भेटली नव्हते. आणि त्याला पाहिले ही नाही... खुपदा ठरवलं भेटायचं म्हणून... ते कधीच शक्य झालं नाही. त्याला भेटण्यासाठी मी खुप आतुर असायची... खुप सारी स्वप्न घेऊन, खुप प्रश्न घेऊन, दिवसभर त्याचाच विचार असायचा तो कसा असेल? कसा दिसत असेल? मी त्याला आवडेन की नाही? त्याने पहिल्यांदा मला पाहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर काय भाव असतील, तो काय म्हणेल? मी त्याला कसं ओळखेन, त्याने मला लांबूनच पाहून नापसंत करून निघून गेला तर?... अश्या अनेक विचारांनी माझे डोळे पाणावायचे... पण आपण जसा विचार करतो त्या सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या तश्या घडत नसतात... खरं सांगू तुम्हांला, त्याचं माझ्यावर कधी प्रेम नव्हतंच. त्याची ती वासनाच असेल. त्याने मला खुप स्वप्ने रंगवून दाखवीली आणि मी मूर्ख त्याच्या रंगामध्ये रंगून जात होते. मी त्याच्या भेकड कथांवर विश्वास ठेवत गेले... शेवटी काय त्या भेकड कथाच होत्या. त्या कितीही खऱ्या पद्धतीने सांगितल्या तरी त्या खोटयाच. त्याच्याबद्दल काही सांगावं असा तो नव्हताच. ज्ञानेश्वरांनी रेडयाच्या तोंडून वेद वदवून घेतले होते, तरी आजही आपण त्याला रेडाच म्हणतो ना... त्याला वेदांचा दर्जा कधीच मिळू शकत नाही...


मलाच रहावेनासं झालं. खुप दिवस उलटून गेले. तो फक्त बोलतच होता.. मग मीच ठरवलं काहीका होईना त्याला भेटायचंच. मला वाटायचं माझं नशिब माझ्यावर खुप खुष आहे म्हणूनच माझे संबंध त्याच्याशी जुळतायत.


एक दिवस मला माहित नाही कशी पण अचानक एका अनोळखी मुलीशी माझी भेट झाली. म्हणजे खरंतर तिच मला भेटायला आली होती आणि त्याचं खरं रूप, गुढ सत्य माझ्यासमोर आलं... जेव्हा कळलं की ती ही एक माझ्यासारखीच त्याच्या बनावगीरीला बळी पडली होती. हे सगळं कुट ऐकून वाटत होतं, माझ्या हृदयावर कुणीतरी खड्गाचे असंख्य वर करीत आहे. माझं मन सैरावैरा धावत होतं. अश्रु थांबता थांबत नव्हते. विचारांनी काहूर माजवला होता. स्वत:ला कोसण्याशिवाय माझ्याजवळ काहीच पर्याय नव्हता... ती मला नं सांगताच तिथून निघून गेली होती. माझं शरीर गळून पडलं होतं. माझ्या सोबत हा खेळ का घडावा मला माहित नाही. स्वत:ला या सगळ्यातून सावरण्यात खुप दिवस निघून गेले... हृदय बंदिस्त झालं होतं. मनही मेल्यागत जाणवायचं... जगण्याची कोणतीच ईच्छा उरली नव्हती. माझ्यात सारंकाही उदासीन झालं होतं.


एकदा माझ्यातला राग खुप अनावर झाला होता जेव्हा त्याला मी विचारलं, “माझ्या सोबत असं का केलंस? का माझा खेळ केलास?” आणि त्या निर्लज्जाने हसत फोन ठेऊन दिला. वाटत होतं जावून त्याच्या दोन थोबाडीत लगावून द्याव्या. पण विचार केला मीच चुकले होते.... इथे फसणं फार सोपं असतं आणि फसवता येणं त्याहूनही सोपं...


नंतर मीच स्वत:शी ठरवलं, यापुढे असल्या गोष्टींचा विचार करायचा नाही. आता जगायचं तर फक्त आपल्या आई-वडिलांसाठी. जमेल तितकं त्यांना प्रेम द्यायचं. त्यांना एक कर्तव्यदक्ष मुलगी होऊन दाखवायचं... आणि आयुष्याची वाटचाल नव्याने सुरु करायची.


आज पुन्हा नव्याने त्याच गोष्टी माझ्याशी जोडल्या जातील याची खात्रीच होत नाहीय, पण या साऱ्यांमध्ये इतकी भिन्नता असू शकते हे माहित नव्हतं. आज पुन्हा त्याच गतकालीन चिरदाय वेदनेची आठवण मला होईल वाटलं नव्हतं. आणि त्या जखमा इतक्या सहज भरून काढल्यात तुम्ही की मी त्यात माझंपण विसरून गेले. फार कमी दिवसच राहिले मी तुमच्यासोबत.. चांगला जोडीदार कुणाला नको असू शकेल?... काही असे नशीबवान असतात की कित्येकदा दगा मिळालेला असुन सुद्धा त्यांच्यावर कुणीतरी एखादी व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रेम करणारी असते आणि काही असे कमनशीबी असतात की एखादी व्यक्ती त्यांच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करत असते तरी सुद्धा ती त्यांच्याशी दगा करून जाते.


मलाही तुमच्यात तिच जाणीव दिसून येते. खरंच मी नशीबवान आहे तुमच्यासारखा जोडीदार मला लाभला...
जगावं कसं आणि मरावं कुणासाठी या गोष्टींची जाण तुम्हीच मला करून दिलात. तुम्हीच एकदा म्हणाला होतात मला...
आभाळ कितीही मोकळं असलं तरी
ते घिरट्या घालण्या इतकंच,
प्रेम कितीही अथांग असलं तरी
ते भावनांन इतकंच...


खरंच आज तुमची खुप आठवन येतेय. आज माझ्यात जो काही नैतिक बदल घडलाय तो फक्त तुमच्यामुळेच. आई-वडिलांनी जन्म दिला, पालन पोषण केलं, शिक्षण दिलं, पण तुम्ही ज्ञान दिलंत, आयुष्याची दिशा तुम्ही दाखविलात. प्रेमाची खारी परिभाषा काय आहे हे तुमच्या कडूनच शिकले मी... असो, आपण पुन्हा कधी भेटू की नाही माहित नाही पण मी तुमची शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहत राहीन. माझा अखेरचा एक श्वास जरी मला तुमच्या सोबत रहायला मिळाला तरी माझं जगणं सफल होऊन जाईल. मला माहित आहे या जगात माझं म्हणण्यासारखं काहीच नाही पण मी तुमची आहे आणि तुमचीच राहणार...


तुमची पत्नी...