एक पाऊस असाही


प्रलयाचा अनुभव कित्येकदा दूरदर्शनच्या माध्यमातून घेतला होता. पण यंदा समक्ष महाप्रलयच येईल असे वाटले नव्हते आणि ते ही माझ्या सोबत समस्त मुंबईकरांवर... असे तर मुळीच नाही.

अगोदर उन्हानं एखाद्या तापलेल्या तव्यावर पोळी भाजून काढल्याप्रमाणे मनुष्य पुरता भाजून गेला आणि आता पावसानं एखाद्या क्रांतीकारकावर निर्बंध लादल्याप्रमाणे! हे कुणीच पाहत नव्हतं का? रुळावर टायर पंक्चर झाल्याप्रमाणे लोकल ठप्प झाल्या होत्या. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या लोकलच्या डब्यांसारखे सरकारी लाल डब्बे, त्यामागे प्रायवेट प्रॉपटीचे एअरकंडीशन, सोबत मध्यमवर्गीयांची काळी पिवळी चार चाकी, अधून मधून डोंगळयाप्रमाणे दिसणाऱ्या दोन चाकी आणि मधूनच डोक्यापर्यंत दिसणारा मुंबईकर! एरवी सोसायटीमध्ये तळमजल्यावर राहणाऱ्यांची वेगळीच शान होती. जिने चढण्या उतरण्याचा त्रास नाही आणि आजुबाजूची ऐस पैस मिळालेली जागा. त्यांची उडालेली तारांबळ पाहून मी मात्र स्तब्ध होतो. तळाकडील माणसांचा आक्रोश चालूच होता आणि वरच्या मजल्यावरची माणसे त्यांचा धीर खचू देत नव्हती. एखाद्या टाकीत सोडलेल्या पाण्याप्रमाणे पाण्याची पातळी पायरी चढत होती. पायरीचा पहिला मजला होता फार वेळ लागला नाही. मी आपला पुढच्या वर्षीच्या बंदोबस्ताच्या विचारांत होतो. घर घ्यावं तर तिसऱ्या मजल्यापर्यंत. सोबत पलंग नसला तरी चालेल ‘टायरच्या टयुबा’ आणि चार माणसी एखादी ‘तर’ (होडी) असावी.

थोडासा वाव मिळता राजकारणी मंडळींची धावपळ सुरूच होती. तात्पर्य दुरून डोंगर साजरे! कधी मापात पाप होत होतं तर कधी मापटच गुल होत होतं. सर्व धर्मियांची लाडकी मुंबई म्हणून मदत निधीतून लाखो लोकांसाठी हजारो करोड येत होते. अदयाप त्याचे वाटप होतच आहे. उपासमारीमुळे वैतागलेली जनता रस्त्यावर उतरली की तिला हप्त्याभरचं कुरण खायला देवून गप्प करण्याच गणित सोपं असतं. पहिल्यांदाच गरीब-श्रीमंत भेदभाव दिसत नव्हता. मंदिर-मस्जिद समान वाटत होते. प्रकोप कोणाला जातधर्म विचारून येत नसतो. कित्येक दिवस अंधारात दिवे पेटण्याचा भास होत होता. तहान तर लागली होती, पाणी सुद्धा होते पण एका-एकी डोळ्यांसमोर दवाखानेही दिसत होते. मुंबईकरांचा संसार पाण्यावर तरंगताना दिसत होता. सर्वकाही होतं, चुला कुठे दिसत नव्हत्या. मधूनच अफवांनी आपला डाव मांडला. कित्येक बळींचा खेळ रचला. त्या दिवसांत छापखाने मात्र चालू होते. पहिल्यांदाच मुंबापुरीला अस्ताव्यस्त झालेलं पाहुन जीव थोडा घाबरला होता. थोडं शांत झाल्यावर मला कोलंबस व त्याच्या वीरगीताची आठवण झाली..

“हजारो जीव्हा तुझ्या गरजू दे
प्रतिध्वनीने त्या समुद्रा,
डळमळू दे तारे, विराट वादळ हेलकावू दे,
पर्वत पाण्याचे ढळू दे, दिशाकोन सारे!”

प्रसार माध्यमातून मधूनच गावाकडची माहिती मिळत होती. त्यावेळेस ‘मामाच्या गावाला जावूया’ हे विसरून ‘मामालाच इकडे घेवून येऊया’ असं वाटत होतं. हिरवळीच्या गालिच्यावर वसलेलं गाव पिंजाटलेल्या कोंबडीसारखं दिसत होतं. एरवी पावसासाठी आतुरलेला शेतकरी पेरणीसाठी जागा शोधीत होता. पुर्नवसनाच्या विचारांत गावकरी आपला मार्ग काढीतच होता. अर्ध्या-अधिक नाती तुटली होती, संपर्कही तुटला आणि माझ्या विचारांच्या तंतुवाद्याचे तार ही...

- सुनिल संध्या कांबळी.

No comments: