मिस ला लिहिलेले पत्र क्रमांक २
माफ करा मिस, यावेळेस मी स्वत: काहीही लिहिण्याचा प्रयत्न केलेला नाही, पण काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या होत्या. मिस, मला ठाऊक आहे प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते पण त्याचा अंत नसतो. मिस, माझे विचारही असेच आहेत काही मर्यादेपर्यंत येतात अन् काही मर्यादा उल्लंघून जातात म्हणून हे माझं अखेरचं पत्र तुमच्या चरणी अर्पण.
मिस, जेव्हा मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता त्याच्या आठवडयाभरातच मी ओळखलं होतं मी माझं भवितव्य कोणाच्या हवाली केलय ते. तुम्हीच एकदा म्हणाला होतात मीही याहून अधिक चांगल्या कॉलेजमध्ये शिकवू शकते पण कित्येक गरजवंत मुले आहेत की ज्यांना शिकण्याची खरंच मनापासून आवड आहे, शिकण्याबद्दल आत्मीयता आहे. पण त्यांना शिक्षण घेता येणं कठीण असतं तेव्हा ही मुलं अशा कमी सुखसोयी उपलब्ध असणाऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतात याच दृष्टीकोनातून मी इथे प्राध्यापिका म्हणून आले. मिस तेव्हाच मी ठरवलं कॉलेज कसही असलं तरी काय झालं, शिक्षकवर्ग मला हवा तसाच आहे आणि मला मार्ग दिसू लागले... तुमच्यासारख्या शिक्षिका इथे शिकवायला असताना माझं कॉलेज सोडणं अशक्यच! तुमच्या सारख्या शिक्षिका मला लाभल्या हे माझं भाग्यच! मला माहित आहे मिस, माझ्या अभ्यासाबद्दल तुम्हांला फार काळजी वाटते. माझ्या अभ्यासाबद्दल तुम्हांला फार अपेक्षा आहेत आणि मी हे जाणूनही तुमच्या अपेक्षांचा भंग करण्याचा प्रयत्न करतोय. पण खरंच मी ज्या परिस्थितीत अभ्यास करतोय यावर तुमचा विश्वास बसेल की नाही मला माहित नाही. काय सांगू अभ्यासाचा विचार करायला माझ्याजवळ फक्त रात्र उरलेली असते मग यावेळेत मला ठरवावं लागतं मी झोपावं की अभ्यास करावा. आता अभ्यास माझ्यासाठी फक्त विचार बनून राहिलाय मिस, मी माझ्या शिक्षणासाठी काही रक्कम उसनी घेतली होती, या दिवसांत मी ती फेडली. पुन्हा आता मला माझ्या एका ध्येयासाठी अजून काही रक्कम मिळवायची आहे. सध्या त्याच्याच प्रयत्नात आहे. शिक्षण काय मिस, आजपर्यंत जसं घेत माझ्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठीच नाहीतर माझ्यासाठी ठरवलं तर काहीच अशक्य नाही मिस, “स्त्री ने जगावं आलो पुढेही तसच घेईन Earn and Learn.
मी शिक्षण घेतोय ते फक्त ते शील जपण्यासाठी आणि पुरुषाने जगावं ते ध्येय पुर्ण करण्यासाठी”. सध्यातरी मी याच उक्तीचा मार्ग अवलंबलाय. मला वाटतं मिस या जगात एकटयाने वावरणं फार कठीण असतं. इथे येणारा प्रत्येकजण आपल्या जन्मासोबत दैव घेऊन येत असतो आणि जाताना मात्र आठवणी देऊन जातो. आपण त्या आठवणींची संदूक आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी दडवून ठेवलेली असते आणि केव्हातरी एकांतात ती उघडून स्वत: जिवंत असण्याचा समज करून घेत असतो. कधी कधी वाटतं मिस, हे जग अनेक सुखदु:खांनी भरलेला कोंडवाडाच आहे. वाटतं मला जी मुक्ती हवीय ती या जन्मी मिळणं तरी कठीणच. मिस तुम्ही जेव्हा कॉलेज सोडून जाल तेव्हा माझ्या सारख्यांना दुख:ही होईल आणि आनंदही वाटेल. दु:ख याचं की माझ्या नंतरचे या कॉलेजमधील विद्यार्थी तुमच्या ज्ञानापासून वंचित राहतील आणि आनंद याचा की माझ्यासारख्या नविन विद्यार्थ्यांना तुमच्यासारख्या मिस मिळतील मिस. मी एक आर्टसचा विद्यार्थी आहे आणि शिक्षणाच्या दुनियेत आर्टसच महत्व एका वाळीत टाकलेल्या संन्यासासारखं आहे पण खरं सांगू मिस तुमचा हा संन्यासी इतर माध्यमातून शिकणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना एकटा लढत देऊ शकतो. कोणत्याही बाबतीत इतकंतरी सामर्थ्य आहे अजून माझ्यात पण नंतर मीच ठरवतो ‘जाऊ दे’, ही सर्व माझ्या युद्धातील ‘कौरव’ आहेत आणि मी एक ‘कर्ण’. मला माहित आहे मिस; आम्हा विद्यार्थांच्या अशा वागण्यामुळे तुम्हांला किती त्रास होतोय. आमच्यामुळे तुम्हांला सर्व प्राध्यापकांसमोर गप्प रहावे लागते. काय आहे ना मिस; तुम्हांला पडणाऱ्या माझ्याबद्दलच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे आहेत माझ्याजवळ पण मिस; प्रत्येक गोष्टीची ठरावीक वेळ असते ती त्या वेळेतच व्हावी लागते. कॉलेजमधल्या ह्या लहान सहान परीक्षा माझ्यासाठी अशक्य नाहीत. मला पास करायचीय माझ्या आयुष्यातील सत्व परिक्षा ‘माझे ध्येय’. गतकाळास मी गोंजारत नाही आणि भविष्यावर माझा विश्वास नाही. मी मानतो तो फक्त वर्तमान आणि ह्या वर्तमानाला मी तुमच्यासमोर ठेऊन वचन नाही पण वचनासमान शब्द देतो हा ‘एकलव्य’ जरी आयुष्यात काहीच होऊ शकला नाही तरी तुम्ही भविष्यात कुठेही भेटलात तेव्हा याची योग्यता तुमचे चरणस्पर्श करण्याइतकी असेलच. मिस हे जग एक रंगमंच आहे आणि आपण या रंगमंचावरचे कलाकार आहोत. कधी ना कधी आपण आपला अभिनय करून निघून जाणार. उरेल ती फक्त स्मृती. तुमचे आभार कसे मानावे हेच कळत नाही. आता तुम्ही विचार करत असाल मी तर याला कधीच काहीच दिलं नाही, नाही कोणता गुरुमंत्र, नाही कोणतही वेगळं ज्ञान. तेव्हा हा आभार कसले मानतोय. खरंय मिस, तुम्ही यापैकी काहीच दिलं नाही. नाही कोणता गुरुमंत्र, नाही कोणतेही वेगळे ज्ञान पण मिस, मी जे तुम्हांला निशब्दपणे वाचत होतो. तोच माझा गुरुमंत्र होता आणि तेच माझे ज्ञान. मी कधीही तुम्हांला प्रत्यक्षपणे प्रश्नं विचारली नाहीत आणि तुम्हीही कोणतीच उत्तरे दिली नाहीत ... पण तुम्ही समोर असताना मी तुम्हाला अनेक प्रश्नं विचारीत होतो मनातून ... जाताना ती प्रश्नं असायची आणि तुमच्याकडून परावर्तीत होऊन येताना मात्र ती उत्तरं असायची. हो आणि त्यांनाच मी माझी दिशा बनवत गेलो. मी कुठेतरी ऐकलं होतं मिस; वाचन, लेखन व मनन या अभ्यासाच्या तिन्ही पायऱ्या चढून गेल्यानंतर पाऊल यशोमंदिरातच पडते म्हणून मिस तुम्ही माझी काळजी करू नका. मी करेन ते योग्यच करेन. जीवनातील प्रत्येक समर जिंकूनही नेहमी हरल्यासारखं वाटत होतं, आजही तेच... अगदी तसंच... माझी साधना सफल झाली. मी माझ्या गुरुच मन जिंकू शकलो, पण आज माझा गुरु माझ्यापासून दुरावलाय. मी जिंकूनही आज हरलोय. का कोण जाणे आज सारखं वाटतं भविष्यात तुमची केव्हातरी भेट घडावी एवढीच गुरुचरणी अपेक्षा!
- सुनील संध्या कांबळी
No comments:
Post a Comment