Behind every grate fortune there is a crime

माझे शिक्षण

मिस ला लिहिलेले पत्र क्रमांक १

कॉलेज म्हणजे प्रत्येक तरुण मुलाच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण... सगळेच म्हणायचे कॉलेज म्हणजे नुकतेच पंख पसरून उडायला लागलेल्या पक्षांचा थवाच... एखाद्या स्पर्शाने पाण्यावर उठणाऱ्या तरंगाप्रमाणे एक भावतरंगीत, अपरिचित असा संबंधच... तिथेच जुळत असतात स्वप्नातल्या ताऱ्यांची नाती आणि तिथूनच सुरुवात होते खऱ्या जीवनाला.

मिस आज माझा कॉलेजचा पहिला दिवस आहे. का कोण जाणो आज मला तुमचे चरणस्पर्श करावेसे वाटले. कधी नाही ते आज मला माझं मन पुढे ढकलत होतं. मला सारखं सांगत होतं, “अरे जा, इथे उभा का आहेस? कसला विचार करतोयस? अरे जा, नाहीतर त्या निघून जातील. मी धावतच तुमच्यापाशी आलो, तुमच्याशी संवाद साधला आणि तुमचे चरणस्पर्श केले. तुम्ही सहज उदगारून गेलात “गॉंड ब्लेस यू”. मला तुमच्याकडून हे प्रत्योत्तर अपेक्षित नव्हतं. माफ करा “लहान तोंडी मोठा घास” तसा देवावर माझा फारसा काही विश्वास नाही. काय करू मिस, परिस्थितीने मला पुरोगामी बनवलय. जे डोळ्यासमोर घडताना दिसेल त्यावर विश्वास ठेवायला शिकवलय. मला तुम्ही “देव तुझं भलं करो” म्हणण्याऐवजी नुसतच “यशवंत हो” म्हणाला असतात तरी मी बरच काही मिळवलं असतं. असो तोही गुरुचाच आशिर्वाद म्हणावा. तो दिवस तर माझ्या हक्काचा होता. त्या दिवशी ‘गुरूपौर्णिमा’ होती आणि त्या दिवसापासूनच तुमच्या आणि माझ्या गुरु-शिष्याच्या नात्याला सुरूवात झाली होती.

मला आज माझ्या आयुष्यात घडलेले काही क्षण तुम्हाला सांगायचे आहेत. मिस, आज मी हा जो कुणी तुमच्या समोर उभा आहे तो सहजच नव्हे. इथे येण्यासाठी मला दोन वर्षाचा खडतर प्रवास करावा लागला. बऱ्याच परिश्रमाने आणि जिद्दीने मी आज कॉलेज गाठलच. इथे येण्यास माझा प्रवास सुरु झाला तो माझ्या नाईट शाळेपासून. तुम्हाला तर माहीतच असेल नाईट शाळेत शिकणाऱ्या मुलांची परिस्थिती काय असते? माझीही गत तीच होती. माझ्या घरचं वातावरण तसं अभ्यास करण्यायोग्य नव्हतं. सकाळपासून काम करून घरी परतलो की पूर्ण शरीरात मुरगळा असायचा. काम कसलं तर ... “वेल्डिंग वर्क” सगळं काम अवजड असायचं. डोळ्यांना न सहन होणारा त्रास काळोख पडायला लागला की डोळे दुखायचे, चुरचुरायचे. जणू कुणी डोळ्यांत काचांचा चुरा टाकला असावा. दररोज दवाखान्याचा खर्च परवडण्यासारखा नव्हता मला म्हणून मीच माझा डॉक्टर झालो होतो. उपाय म्हणून जेवणानंतर विक्स अँक्शन फाय हंड्रेडच्या दोन गोळ्या घ्यायच्या नाहीतर डोळ्यांना विक्स बाम चोळायचा. डोळ्यांना लागणारी सगळी औषध होती माझ्याजवळ. कधी कधी परिस्थिती अशी असायची की यातलं काहीही नसायचं, मग आयुर्वेदिक उपाय बटाटाच्या कापा डोळ्यांना रुमालाने गच्च बांधून ठेवायच्या. अर्ध्या पाऊण तासाने डोळे थोडेसे थंडावले की आपलं अभ्यासाचं धोपटं उचलून शाळेत जायचं. या सगळ्यात मात्र अभ्यासाची हेळसांड व्हायची ती भरून काढण्यासाठी मी रात्री अभ्यासाची पुस्तकं आणि एक चादर पिशवीत घालून सरकारी अभ्यासिकेत जायचो. रात्री एक ते दिड वाजेपर्यंत वाचन केलं की तिकडेच आसपासचे पेपर जमवून ते अंगाखाली पसरवून तिथेच अंग टाकायचो. कधी डोळा लागायचा कळत सुद्धा नव्हतं. एवढं करून सुद्धा वाचलेलं लक्षात राहील याची शाश्वती नव्हती. कारण दिवसभर मशीनचा आवाज कानात घुमत असायचा.

सरकारी लाईट खांब्याखाली बसून अभ्यास करणाऱ्या बऱ्याच थोर मंडळींची उदाहरणं डोळ्यांसमोर होती, पण मला मात्र बरेच लाईट खांबे बदलावे लागलेत. बरेचसे अनुभव त्या रात्रींनी मला दिलेत. झोपलेल्या मुंबईमध्ये जागणारी माणसे कशी वागतात? हे अगदी जवळून अनुभवलं होतं. येणारा प्रत्येक क्षण माझ्या अभ्यासाबरोबर मला जीवनाची गती समजावून सांगत होता. तेव्हा मात्र एक गोष्ट जाणवली, एका दिव्याच्या उजेडासाठी माझ्या थोर पूर्वजांना किती परिश्रम घ्यावे लागले असतील? त्या अर्धप्रकाशित दिव्याखाली अभ्यास करून संपूर्ण राष्ट्राला तेजोमय करण्यात किती मेहनत असेल? मिस खरी कसरत असायची ती माझ्या परीक्षेच्या वेळी, माझा दिनक्रम तोच असायचा, पण अभ्यासाच्या वेळेत वाढ झालेली असायची. मग माझ्या अभ्यासाचं धोपटं माझ्यासोबत माझ्या कामाच्या ठिकाणी येऊ लागलं, तेव्हा जेवणाच्या वेळी एका हातात घास असायचा आणि एका हातात पुस्तक असायचं. त्या दिवसात ठरवायचो, फक्त एक वेळच जेवण जेवायचं. कारण रात्री जेवलो तर झोप येईल म्हणून महिनाभर हिच तऱ्हा असायची. अश्या परिस्थितीत त्याचा परिणाम माझ्या प्रकुतीवर आलेला दिसून यायचा. ओळखीतली माणसे आपापल्या परीने चौकश्या करी, “काय रे, मलेरिया झालाय काय?” डोळे बारीक झालेत. “कावीळ असावी नाही रे?” अशक्तपणा आला असणार, काम का सोडून देत नाहीस? दैव माझं, कुणी टी.बी. ची लागण झाल्याचं नाही म्हंटलं. मिस, माणसाचं पण कसं असत ना? गरज असताना हात देण्यास कुणीच पुढे येत नाही. सांत्वन मात्र वेगवेगळ्या परीने करतात, तीही खोटी. मिस, तुम्ही आता हा विचार करत असाल ना? याने एवढे कष्ट उपसलेत म्हणजे नक्कीच हा चांगल्या मार्कांनी पास झाला असणार. तुमचं बरोबर आहे, पण ते आभाळ माझ्यावर कोसळलं आहे. मिस, आश्चर्य वाटून घेवू नका मी तेव्हा तब्बल दोन विषयांत नापास झालो. आता काय म्हणाल, तर मी दुर्दैवी लहानपणापासूनच होतो. पण आज जेवढा मी रडलो यापूर्वी कधीही रडलो नव्हतो. माझ्या डोळ्यांत दु:खाचे अंश्रू उभे राहिले खरे पण मी माझ्या मनाला समजावलं. एखाद्या रथाच्या घोडयांचा वेग आवरताना सारथ्याची जशी अवस्था होते, तशी माझी अवस्था झाली होती. दुखांनी माझ्या मनात काहूर माजवले होते. कसेबसे समजावले मी माझ्या मनाला. मिस, मीच कुठेतरी कमी पडलो असणार नाहीतर, पंधरा ते तीस मार्कांसाठी नापास झालो नसतो. केलेल्या कष्टाचं मोल झालं नाही, म्हणून संतापात ती नापासाची गुणपत्रिका तिथेच फाडून फेकून दिली. पुन्हा डोळ्यांतून काही अश्रू गालावर ढाळले, पुन्हा निश्चय केला नव्याने अभ्यासाला सुरूवात करायची. आत्ताच्या वेळेस हरायचं नाही. कोणत्याही मार्गाने या परीक्षांच्या छातीवर पाय रोवून उभं रहायचंच. यंदा अपयशाला चपराक मारल्याशिवाय गप्प बसायचं नाही. मिस, या वेळेस माझ्या दिनचर्येत थोडा बदल झाला होता. माझा जो पूर्ण वेळ मी माझ्या कामासाठी देत होतो, तो वेळ मी माझ्या अभ्यासासाठी दयायला लागलो. पण काम सोडून जमण्यासारखं नव्हतं, मित्राच्या ओळखीने अर्धवेळ काम शोधलं होतं. पुन्हा त्याच जोमाने आणि त्याच विश्वासाने, त्याच एकाग्रतेने अभ्यासाला सुरूवात केली. अखेर माझ्या संचिताला माझ्यासमोर हार मानावीच लागली. मिस... मिस, यावेळीही माझे डोळे अश्रूंनी भरून आले होते. ते दुखांच्या अश्रुंनी नव्हे तर आनंदअश्रुंनी! माझ्या छाटलेल्या पंखांना पुन्हा बळ येऊ लागलं. मिस, मी पुन्हा आकाशी गरुडझेप घेतली. आता माझ्या आनंदाला काहीच सीमा उरली नव्हती वेळ कुणासाठी थांबत नसते म्हणून माझं थांबण शक्य नव्हतं. मी माझा पुढचा मार्ग कसा काढावा याचा विचार करत होतो. कॉलेजमध्ये प्रवेश कसा मिळवायचा? कोणत्या कॉलेजमध्ये मिळवायचा? माझ्या शिकण्यायोग्य कॉलेज कोणतं असेल? कोणत्या कॉलेजचा गुरुजनवर्ग मला आदरा योग्य असेल? कॉलेज संबंधी कित्येक प्रश्न माझ्या डोळ्यासमोर येऊन उभे राहिले. माझ्या माहितीतल्या सर्व कॉलेजचे प्रवेश अर्ज मी भरले. कॉलेजला जाण्याच्या मोहात, मी एक गोष्ट विसरून गेलो होतो या कॉलेजची फी कुठून भरायची. माझी परिस्थिती फी भरण्यायोग्यही नव्हती. प्रवेश तारखा जसजशा जवळ येऊ लागल्या तसतशी माझ्या मनाची चिंता वाढू लागली. कॉलेजच्या प्रवेश पात्रता याद्या फळ्यावर लागू लागल्या. मी नेहमी कामावरून सुटल्यावर ज्या ज्या कॉलेजचे प्रवेश अर्ज भरले होते, त्या त्या कॉलेजचे फळे दररोज तपासत होतो. माझ्या शिक्षणाच्या दुष्टीकोनातून माझ्यासाठी उत्तम असं कॉलेज मला हवं होतं. काही कॉलेजच्या लिस्टवर माझं नाव आलं होतं, पण त्या कॉलेजची फी मला परवडण्यासारखी नव्हती. अखेर मला माझ्या एका चुकीची जाण झाली. “आपण आपले अंथरूण बघून पाय पसरावेत. मी एका कॉलेजचा अर्ज भरायचा विसरलो होतो, ज्या कॉलेजच्या गेटपाशी बसून मी कित्येक वेळा रडलो होतो, नेहमी येणाऱ्या अपयशांना कोसत होतो, कॉलेजला जाण्याची स्वप्न रंगवत होतो, ज्याने मला अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली होती, माझ्या त्या कॉलेजला मी विसरलो होतो. “असा कसा काय मी बेपर्वाइने वागलो”! मला ठाऊक नाही. मात्र निर्धार पक्का केला. काही झालं तरी याचं कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायचा. प्रवेश अर्ज देण्याचा शेवटचा दिवस होता. मी त्याच दिवशी अर्ज भरून दिला आणि इथवर येऊन पोहचलो.

मिस, माझ्या आयुष्यात काहीच गोष्टी असतील ज्यांच्यावर मी खऱ्या अर्थाने प्रेम केलं. ‘सूर्य’ माझा सर्वात आवडता गुरुवर्य, ज्याच्या सोबत मी लहानपणी तासंतास बोलत असायचो. माझ्या जीवनाच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मला त्याच्याकडून मिळायची. मी माझं एकटेपण त्याच्याकडेच व्यक्त करतो अजूनही .... मी प्रेम केलं ते माझ्या देशावर! अगदी सैनिकाप्रमाणे. जणू मी माझ्या देशाचा देशपुत्रच! मला सर्वात अतिप्रिय असणारी माझी ‘मुंबई’ जिने मला माझं सर्वस्व दिलं, जिच्या बद्दल माझ्या मनात प्रेमभावना मरणोत्तर राहणार जणू ती माझी आईच! पण माणूस तरी स्वत:ची वेडी समजूत किती वेळा काढणार? किती वेळ स्वत:ला अंधारात ठेवणार? त्यालाही जिवंतपणाची चाहूल हवीच ना! माणसाने आपली एक वेगळी ओळख बनवायची असते. त्यासाठी त्याला गरज असते खऱ्याखुऱ्या गुरुची, त्याच्या योग्य मार्गदर्शनाची, त्याच्या सहवासाची, त्याच्या प्रेमाची आणि आज ते स्थान तुम्ही घेतलं आहात. मी म्हणजे चालता फिरता यंत्र होतो. माझी स्पंदन तुम्ही झालात, माझ्याशी ऋणानुबंध जुळविलेत, माझ्या विचारांना गती दिलीत, माझं मनही तुम्हीच झालात. मला जे जे काही माझ्या गुरूकडून अपेक्षित होतं, ते सारं काही तुम्ही दिलेत, पण निशब्द! मिस, लहानपणापासून कोणती अपेक्षा कधीच केली नाही. माझ्या आयुष्यात जे क्षण जसे आले मी तसाच जगत गेलो. म्हणून वाटतं आपल्यामधील प्रेमभावना, आदरभाव असेच कायम रहावेत. आपल्या गुरु-शिष्याचं नातं असंच पणतीतल्या ज्योती प्रमाणे तेवत रहावं ... निशब्द असलं तरी सुद्धा!

मी लहानपणापासूनच स्वत:चे निर्णय स्वत:च घेत आलो. जेव्हा माझ्यावर अगदी वाईट प्रसंग ओढवले तेव्हाही मी माझ्या अचूक निर्णयाने येणाऱ्या संकटांवर मात केली. त्या तडजोडी करत असताना मी काही योजना आखल्या होत्या. त्यातील एक ध्येय होतं ‘कॉलेज’. कॉलेजमध्ये शिकणं मला एवढं महत्वाच नव्हतं. तेवढा वेळही नाही माझ्याजवळ आणि परिस्थितीही. कॉलेजमधील जीवन विद्यार्थ्याला कसं घडवत असतं ते पहायचं होतं. मी माझं काही आयुष्य मुंबईच्या सेवेसाठी अर्पण करण्याचं ठरवलंय म्हणून तुम्हांला माझी चिंता करण्याची आवश्यकता नाही. माझी बरीचशी ध्येय अजून अपुरी आहेत आणि ती पूर्ण करण्याकरिता माझ्याजवळ वेळही अपुरा आहे. मी हे सारं लेखरूपाने सांगण्याचं कारण म्हणजे मिस, मला तुमच्यासमोर कधीच व्यक्त होता आलं नाही. खंत तर एकाच गोष्टीची वाटते की, इच्छा नसतानाही माझ्या या लेखणीला अंत पहावा लागतोय. या आधीही मी बरंच काही लिहिलं पण खरं सांगायचं तर आज पहिल्यांदाच या लेखणीची सांगता करताना माझ्या बोटात प्राण उरले नाहीत. मिस, मी तुमच्या कडून कोणत्या उत्तराची अपेक्षा करीत नाही पण जमलंच तर मला समजून घ्या आणि माझ्याकडून अजाणतेपणी काही चुका झाल्या असतील तर मला शिष्य ‘एकलव्य’ समजून क्षमा करा.

- सुनिल संध्या कांबळी.

No comments: