सांज ढळायला लागली होती. भूरसट लाल आकाशातून पाखरं घरटयाकडे परतत होती. मंद जाणवणारा वारा, खिन्न वातावरण, अधून मधून रातकिडयांच्या आवाजाला सुरुवात झाली होती. त्या शांत वाटेवरून सलिल झपाझप पावलं टाकीत चालला होता. आपल्याच विचारांत गर्क होऊन. तिकडे माया त्याची दाराकडे डोळे खिळवून वाट पाहत होती. उगीचच तिचं मन कसल्या बसल्या विचारांत घुटमळत होतं. काहीच दिवस झाले होते त्या दोघांना तिथे रहायला येऊन. शेजाऱ्यांशी फारशी ओळख झाली नव्हती. त्याचं नवीनच लग्न झालं होतं. त्यामुळे ती फक्त सलिलच्याच काळजीत होती. त्याचं राहतं ठिकाण गाव असलं तरी शहरापेक्षा कमी नव्हतं, पण या दोघांसाठी ते अनोळखी होतं.
आता फारच उशीर झाला होता. सलिल अजून घरी परतला नव्हता. शेजारी माणसं झोपी गेली होती. दिवे विझले होते. खिन्न वातावरणात रातकिड्यांची किर्रर्र ... सर्वत्र अंधार दाटला होता. मायाला आपल्या एकटेपणाची भीती वाटू लागली. तिने झडपा आतून ओढून घेतल्या. सलिल यायचा होता म्हणून जेवायची थांबली होती. एकटेपणा तिला सतावत होता. तिने दरवाजा आतून ओढून घेतला. अन् ती सोफ्यावर जाऊन पहुडली. तिचा डोळा लागणारच होता इतक्यात दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. रात्र असल्यामुळे तिने आतूनच आवाज दिला. “कोण आहे?” “मी सलिल” आवाज विश्वासाचा वाटला. लगेच तिने दार उघडलं. सलिलला पाहिल्यावर तिच्या साऱ्या चिंता दूर झाल्या. तिच्या नजरेत असणारे सारे प्रश्न सलिल सहज ओळखू शकत होता, पण ते तिला विचारण्याइतकाही त्याच्यात त्राण उरला नव्हता. तो फार थकला होता. सलिल आत आला पायातून बुट उतरवले अन् आपलं शरीर सोफ्यावर लकटून दिलं. मन मागे टाकून डोळे मिटून पडून राहिला. माया त्याच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहत होती. तिला सलिलचा फार हेवा वाटत होता. त्याच्या ध्येयनिष्ठतेवर, मेहनतीवर, त्याच्या एकाग्रतेवर भाळावून जाऊन तिने त्याला होकार दिला होता, घरच्यांचा विरोध असूनही...
तसा सलिल मध्यमवर्गीय. अभ्यासात हुशार, मेहनती, कोणतीही गोष्ट डोळ्यांसमोर ठेवून ध्येय समजून पुर्ण करणे हा त्याचा गुण. सरळ स्वभावी त्याच्या लहानपणीच त्याच्या आई-वडिलांना काळाने ओढावून नेलं होतं. सुरुवातीची काही वर्षे त्याने फुटपाथवर काढली होती. अगदी कोवळ्या वयातच त्याने कष्ट उपसायला सुरुवात केली होती. “अर्न अॅन्ड लर्न” हा त्याच्यात असणारा अतिमहत्त्वाचा गुण होता. काम करून पैसा मिळवणे, आणि शिक्षण घेऊन ज्ञान प्राप्त करणे यातच त्याला समाधान वाटे. आता त्याने शिक्षणाच्या जोरावर चांगली नोकरी मिळवली होती. कंपनीने त्याला राहण्यास जागाही मिळवून दिली, पण त्याने शिक्षण सोडले नाही.
तो युनिव्हर्सिटीतून पहिला आला होता, म्हणून त्याचा युनिव्हर्सिटीतर्फे एक छोटासा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. त्याच समारंभात मायानं त्याला पहिल्यांदा पाहिलं. माया समारंभात प्रमुख अथितींच्या सोबत आली होती. त्यांची मुलगी म्हणून. अद्याप ती युनिव्हर्सिटीत शिकत होती. तिच्या वडिलांच्या हस्ते पारितोषिक स्विकारणाऱ्या सलिलकडे ती एकटक पाहत होती. अत्यंत साधेपणात त्यानं पारितोषिक स्विकारलं. त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याची विचारशैली, त्याची ती पर्संनॅलिटी सहज कोणालाही मोहात पाडणारी होती. तेथून घरी गेल्यावरही ती सलिलचाच विचार करत होती. तिने तिच्या वडिलांना विचारलं “डॅडी तो सलिल युनिव्हर्सिटीचं पारितोषिक घेताना किती साधेपणात आला होता ना”! “येस, बट यु डोन्ट नो माय चाईल्ड, धिस पर्सन इज व्हेरी जिनिअस” तिच्या वडिलांनी उत्तर दिलं. “आय नो दॅट, ही गॉट गुड परर्संनटेज इन युनिव्हर्सिटी” नो नो ... दॅट इज नॉट इंपॉटनन्ट बट इंपॉटनन्ट इस दॅट, ही इज मोर स्ट्रगलर ही कम्प्लीटेड ऑल एज्युकेशन बेनिथ अ स्ट्रीट लाईट ...
“हाऊ कॅन इट पॉसिबल?” मायाने त्याच्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. ही इज व्हेरी इंट्रेस्टिंग पर्सन! ती मनातूनच म्हणाली. “डॅड कॅन यु हेल्प मी?” यस डिअर. डॅड कॅन यु गिव्ह मी हिज कॉन्टॅक्ट नंबर?” तिने वडिलांकडे विनंती केली. “इट इज नॉट पॉसिबल बट आय विल ट्राय” एवढं म्हणून तिचे वडील तिथून निघून गेले.
“सॉरी माया ही हॅज नॉट एनी कॉन्टॅक्ट नंबर; बट यु डोन्ट व्हरी आय गॉट हिस रेसिडशिअल अॅड्रेस, हिअर यु आर”. थॅक्स डॅड तिचा चेहरा आनंदाने खुलून आला होता. त्याच दिवशी माया सलिलला भेटायला त्याच्या घरी गेली. पण तो घरी नव्हता. बऱ्याचदा जाऊनही सलिल तिला भेटत नव्हता. तो त्याच्या कामात अन अभ्यासात मग्न असायचा. तो फक्त रात्री झोपण्यासाठी घरी यायचा. अखेर सुट्टीच्या दिवशी मायाने त्याला गाठलंच. सलिलने तिला ओळखलं. पुढे मायाने त्याच्याशी ओळख वाढवली. सलिल अकाऊन्टंसमध्ये हुशार होता. तिने त्याला अकाऊन्टंस शिकवण्यास विनंती केली. त्याला बदल्यात शिकवणीची फी मिळत असे. पुढे ओळखीचे रुपांतर पक्क्या मैत्रीत झालं आणि तिथूनच दोघांच्या लग्नाच्या गाठी जुळल्या.
माया उच्चभू वर्गातली. कामकाजाची फारशी सवय नसलेली. घरात सजावटीच्या, आरामदायी ज्याकाही वस्तू होत्या त्या तिला तिच्या मित्र मैत्रिणींनी लग्नात भेटवस्तू म्हणून दिल्या होत्या पण, सलिलला त्याचा जराही मोह नव्हता. सलिलच्या निरमोही गुणांमुळे तो अधिक तिच्या मनात भरला होता. त्याच्याखातर ती तिच्या वडिलांच्या विरोधांना न जुमानता त्यांना सोडून सलिलकडे आली होती.
काही वेळाने सलिलने डोळे उघडले. समोर माया पाण्याचा ग्लास घेऊन उभी होती. सलीलने एका घोटात संपुर्ण ग्लास घश्याखाली उतरवला. सलिल तुम्ही हात पाय धुवून घ्या. मी पान वाढायला घेते. “म्हणजे तू अजून जेवली नाहीस?” मी तुमचीच वाट पाहत होते. आणि मी आलोच नसतो... सलिलचा तर पूर्ण होण्याआधीच मायाने त्याच्या ओठांवर हात ठेवला.
सलिल काही न बोलता जेवायला बसला. माया जेवण बनवण्यात इतकी हुशार नव्हती. तिच्या जेवणाला रुचकरपणा नसे. पण, सलिल कधीच तशी तक्रार करत नसे. कारण त्याला भुकेचा अर्थ माहित होता. तो निमुटपणे जेवला अन बेडवर जाऊन कलंडला. तोवर माया त्याच्या शेजारी येऊन पहुडली. सलिलच्या केसात नखं खुपसत तिने मंद स्वरात त्याला विचारलं, “काम फार असतं का? नाही म्हणजे तुम्हाला यायला आज-काल फार उशीर होतो. कामाचा जर अती त्रास होत असेल तर मी डॅडला तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी काम मिळवून दयायला सांगेन”. त्याच्या बददल तिला वाटणारी आस्था पाहून त्याने तिला काहीच न बोलता आपल्या मिठीत घेतलं.
तिकडे मायाच्या वडिलांना तिची आठवण येऊ लागली. सलिल घरी नसताना ते अधून मधून तिला भेटून जात. मुलगी आनंदात आहे पाहून ते सुखावत. पण, ती ज्या एषो आरामात वाढली होती, त्या सुखांना ती परकी झाली होती. तिच्या संसारात मदत करावी तर, सलिलसारख्या माणसाचा स्वभाव त्यांना माहित होता. अशी माणसं कष्ट करून आपली हाडं झिजवतील, मोडून जातील पण, कुणाची मदत घेणार नाहीत. अगदी प्राण गेला तरी बेहत्तर!
दिवसामागून दिवस जात होते. सलिलचं असं उशिरापर्यंत घरी परतणं मायाला कोणतच सुख मिळू देत नव्हतं. एकीकडे त्याच्या मेहनतीचा तिला हेवा वाटत असे. पण, घरातील शांतता तिला पछाडू लागली. अधून मधून भेटायला येणाऱ्या मित्र - मैत्रिणीचं भेटणंही मंदावलं. ते सगळे आपल्या मार्गाला लागले होते. मनात विचारांच्या अनेक लाटा उसळत होत्या. तिला मनाचा हा कोंडमारा सहन होत नव्हता. घरातल्या आवराआवरीमुळे तिला बाहेर पडणं कठीण होत होतं. यापूर्वी ती आपल्या वडिलांच्या घरी मन बंदिस्त करून कधीच जगली नव्हती. तिचं स्वातंत्र्य तिला खुंटल्यासारखं वाटत होतं. एके दिवशी तिने, सलिलला विचारलंच. तुमचं हे असं नेहमी घरी उशिरा येणं मला पटत नाही. तुमच्या सोबत जीवन जगण्याची मी जी काही स्वप्नं पहिली होती, मला वाटत नाही की ती पुर्ण होतील.
मायाचा आवाज वर चढत होता. मला वाटतं तुमच्याशी लग्न करून मी माझ्या स्वातंत्र्यावर बंधन घालून घेतलंय. माझं एषो आरामातलं जगणं, माझे डॅड, माझे हाय स्टेटस सोडून मी तुमच्याकडे आले. मलाही माझ्या भावना आहेत, माझे स्वतंत्र विचार आहेत, माझ्याही काही अपेक्षा आहेत. तुम्हाला माझ्या अपेक्षाभंग करण्याचा अधिकार नाही. मी तुमच्या ध्येयनिष्ठतेवर, मेहनतीवर, तुमच्या कुशल बुद्धीवर भारावून मी तुमच्याशी लग्न केलं. पण मला याची जराही कल्पना नव्हती, की तुमच्यासारखी माणसं आतून इतकी एकलकोंडी असतील.
एवढं ऐकूनही तो मायावर रागवला नाही. त्याने अगदी साध्या सोप्या शब्दात उत्तर दिलं. माया मी माझ्या आयुष्यात फक्त एकाच इंनटेन्शनने जगत आलोय तो म्हणजे भरपूर पैसा कमवणे. दैवानं माझ्याकडून हिरावून घेतलेल्या सगळ्या आशा मला पुन्हा मिळवायच्यात. त्यासाठी मला भरपूर मेहनत करावी लागणार आहे. माझी मेहनत, माझा एकालपणा तुझ्या स्वातंत्र्याच्या, तुझ्या हायस्टेटसच्या, तुझ्या डॅडच्या आड येणार असेल तर तुझा मार्ग मोकळा आहे. आणखी एक सांगतो मला माझ्या गुरूंनी सांगितलेलं वाक्य आहे. “स्त्रीने जगावं ते शील जपण्यासाठी आणि पुरुषाने जगावं ते ध्येय पूर्ण करण्यासाठी.” मला मान्य आहे मी तुझ्या सुखांच्या आड येतोय, पण तुझ्या सुखांसाठी मी माझं ध्येय सोडू शकत नाही.
दोघांची मते एकमेकांपासून दुरावली होती, भावनांना तडा गेला होता. पती-पत्नीतलं नातं उरलं होतं तेही संपलं. तिलाही कळून चूकलं सलिलची वाट पाहत जगण्यात काहीच अर्थ उरला नव्हता. आणि सलिल आपलं ध्येय सोडू शकत नव्हता.
एके दिवशी सलिलला न सांगताच माया निघून गेली. घराला कुलूप पाहून सलिल थबकला. त्याने आपल्याजवळ असणाऱ्या दुसऱ्या किल्लीने कुलूप उघडलं. घरातल्या वस्तू जागच्या जागी नीट लावल्या होत्या. माया तिची सुटकेस घेऊन निघून गेली होती. दुसऱ्या दिवशी त्याने मायला फोन केला. माया फोनवर होती. “सलिल माझा तुमच्यावर राग नाही आणि कोणत्याच अपेक्षाही नाहीत. तुम्ही तुमची काळजी घ्या म्हणजे झालं!” एवढं बोलून तिने फोन ठेवून दिला. सलिलला माहित होतं त्याने काय हरवलंय पण त्याच्या ध्येयापुढे तो काहीच करू शकत नव्हता.
काही दिवसांनी दाराच्या कडीला बंद पाकीट अडकवलेलं सलिलला मिळालं. त्याने उघडून पाहिलं तर त्यात होते कोर्टाकडून आलेले डिव्होर्स पेपर्स! त्यावर असणाऱ्या मायाच्या सह्या पाहून त्याच्या मनात एक दु:खाची लहर उठली. त्याने त्याच वेळेस मायला फोन केला. माया, या पेपर्सचा अर्थ काय आहे? मला माहित आहे, माझ्यासोबत जगणं तुला कठीण होत होतं. पण, एवढया टोकाची भूमिका घेण्याची काय गरज होती, तू माझ्याशी असणारं नातं तोडतेयस. तुझा हा निर्णय मला पटलेला नाही. माया मी हे पेपर्स पुन्हा पाठवतोय सह्या न करता...! इफ यू डोंन्ट माईन्ड विश्वास ठेव माझ्यावर मी तुझ्या वैयक्तिक जीवनात कधीच डोकावणार नाही. याला माझी एक विनंती म्हणून समजून घे. लग्न म्हणजे बाहुला-बाहुलीचा खेळ नव्हे जो या डिव्होर्स पेपर्सच्या सह्यांनी मिटवला जाऊ शकतो. तू तुझं जीवन जगायला मोकळी आहेस. एवढयासाठीच मी हे पेपर्स सह्या न करता पाठवतोय. माया त्याचं बोलणं निशब्दपणे ऐकत होती. “सॉरी सलिल! पण माझा नाईलाज होता. ठीक आहे पाठवून दया पेपर्स. सलिल समजून घ्या. मी एक सुशिक्षित आणि आधुनिक काळात जगण्याची सवय असणारी मुलगी आहे. सुखाचा आनंदाचा विचार करत आहे. हे खरं आहे मी काही स्वप्नं पहिली होती. आणि ती मला दरवेळेसच मोडता येणार नाहीत. माझी चिंता करू नका!” एवढं बोलून तिने फोन ठेवून दिला. काही वेळातच तिने सारं विसरण्याचा प्रयत्न केला.
पुन्हा एकदा ती आपल्या हाय सोसायटीत वावरू लागली. तिचं कोंदटलेलं मन पुन्हा एकदा उधान झालं. त्या दिवसात तिला सलिलची एकदाही आठवण झाली नाही. दिवसभर फिरणं, शॉपिंग, रात्रभर पाटर्या, क्लब्स आणि यातच तिचा सारा वेळ निघून जात असे. तिच्या मते जगणं म्हणजे हेच...! तिच्या राहणीमानावरून ती विवाहित आहे हे ओळखणं कठीण होतं. तशी तिने फिगर मेंटेन्ट ठेवली होती. आणि घटस्फोट हाय सोसायटीसाठी वेगळा विषयाचा भाग नसतो. तिने नवा मित्र परिवार जोडला होता.
तेव्हाच तिच्या आयुष्यात विकीनं पदार्पण केलं. मोठया बिझनेसमनचा एकुलता एक मुलगा. कष्ट हा शब्द त्याच्या शब्दकोशात नव्हताच मुळी. रात्रभर हिंडणं, शॉपिंग, डिस्को हा त्याचा छंद. माया पाहताचक्षणी त्याच्या मनात भरली होती. मित्राच्या बर्थडे पार्टीत त्यानं तिला पाहिलं होतं. ओळख वाढवता वाढवता ओळखीचे रुपांतर प्रेमात झालं आणि लग्नाच्या बंधनात. हे सारं फास्टट्रॅक पद्धतीने झालं.
तिला हवी असणारी सारी सुखं त्यानं तिच्या पदरात टाकली होती. पण, ती फक्त सुरुवातीची काही महिने. त्यानंतर विकीचं नेहमी दारूच्या नशेत घरी येणं, डिस्कोमध्ये मैत्रिणींशी अंगलट करणे. त्यातल्या काही वाह्यात मुलींशी त्याचे सबंध आहेत अशा गोष्टी तिच्या कानावर येऊ लागल्या. जेव्हा तो ड्रग्ज घेतो हे तिला कळलं तेव्हा तिच्यावर दुखाचा डोंगर कोसळला. आणि ते खरं आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येत होतं.
या गोष्टी तिने डॅडच्या कानावर घातल्या नाहीत. ते घरी येऊ नयेत म्हणून तीच त्याना जाऊन भेटत होती. त्यावेळेस त्यांची तब्येतही तशी नरमली होती. वरवरचं छातीत दुखणं चालूच असायचं. घरून यायला उशीर झाला की विकी तिला मिळेल त्या वस्तूने मारत असे. पण, वडिलांच्या तब्येतीला जपण्यासाठी ती हे सारं सहन करीत होती. आणि काय म्हणून ती वडिलांना सांगणार होती. विकिशी लग्न करण्याचा निर्णयही तिचाच होता. तो आता पूर्ण नशेच्या अधीन झाला होता.
तिला तिच्या चुकीच्या निर्णयावर पश्चाताप होत होता. पण, सांगणार तरी कुणाला... आणि कोण तिला यातून बाहेर काढणार होतं. तिच्या सगळ्या वाट बंद झाल्या होत्या. तिचं हिंडणं, पाटर्या, शॉपिंग सारं केव्हाच सुटलं होतं. पश्चातापाच्या आगीत होरपळून जाण्यापलीकडे काहीच मार्ग उरला नव्हता. शिवाय त्याच्यात तिला दिवस गेले होते. वडिलांची प्रकुती दिवसें दिवस चिंताजनक होत होती. एक पाहता तिघांचंही आयुष्य शेवटच्या वळणावर उभं होतं.
ती विकीला न सांगताच वडिलांची काळजी घ्यायला जाऊ लागली. विकीला त्याच्या राग येत असे. नशेत तो तिला असह्य वेदना देत असे. विचार करून करून मायाची तब्येत दिवसें दिवस ढासळत होती. तिचा चेहरा निस्तेज झाला होता. तिला तिचे पूर्वीचे दिवस आठवू लागले. सलिल...! आपला सलिल. तो जी काय मेहनत घेत होता ती आपल्यासाठीच, तो अनाथ होतं त्यात त्याची काय चूक होती. त्याचंही कुठे चुकत होतं. त्याला वाटत होतं पैशाने सारी सुखं विकत घेतली जातात. त्याचं बालपण, त्याच्या आशा त्यासाठीच तो झटत होता. बिच्चारा ... सुख, प्रेम, आपलेपणा त्याला कुणीच दिला नव्हता. त्याच्या भोळ्या अपेक्षांचा भंग मीच केला. मला मारणंतर सोडाच कधी उलट देखिल बोलला नाही माझ्याशी. मीच त्याला नको नको ते बोलले आणि तो माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पाहत होता.
रात्री उशिरा को होईना पण घरी यायचा माझ्यासाठी ... मीच त्याला डिव्होर्स पेपर्स पाठवले होते. तेव्हा तो मला म्हणाला होता. लग्न म्हणजे बाहुला-बाहुलीचा खेळ नव्हे. जो या डिव्होर्स पेपर्सच्या सह्यांनी मिटवला जाऊ शकतो. खरंच लग्नाचा खरा अर्थ त्यालाच माहित होता. आता पटलय मला. माझी ही उच्च प्रतिष्ठा काय कामाची जी मला माझं ‘मी’ पण देऊ शकत नाही. देवा! माझा सलिल कोणत्या अडचणीत असेल तर त्याचं रक्षण कर. त्याला माझ्यासारख्या दुखांपासून दूर ठेव. मायाच्या मनात दुखांनी काहूर माजवलं. माया डोळे मिटून आपल्या बंद अंधाऱ्या खोलीत देवाजवळ प्रार्थना करीत होती.
तेवढयात विकी दरवाजा उघडून आत आला आणि हातातल्या कंबरपट्ट्याने मायाला मारू लागला. ती कोडे खात खात त्याला मारण्याचं कारण विचारात होती. रडून रडून बिचारीचा जीव कंठाशी आला होता. तरी, विकी तिला चाबकारतच होता. तो नशेत होता. प्लीज मला मारू नका. मला दिवस गेलेत. पण, तो ते मान्य करायला तयारच नव्हता. मायाने त्याचे पाय धरले भरपूर विनवण्या केल्या पण त्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. मारता मारता त्याचा तोल गेला आणि तो जमिनीवर कोसळला. तो तिथेच पडून राहिला. आणि काहीतरी अभद्र बरळत होता. त्याला कुणीतरी सांगितलं होतं, मायाचं आधी लग्न झालंय. हो गेले असतील दिवस पण. हे पाप माझं नाही असं स्पष्टपणे म्हणून धडपडत उठून तो आपल्या बेडरूममध्ये गेला.
तिला त्याच्या अश्या वागण्याचा कंटाळा आला होतं. काही दिवसांनी तिने त्याच्याकडून डिव्होर्स घेतला आणि ती आपल्या वडिलांच्या घरी निघून आली कायमची. वडिलांना तिने खोटं सांगितलं विकीनेच मला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला इथं पाठवलंय. शिवाय माझं बाळंतपणही इथेच करायला सांगितलंय. पण तिच्या चेहऱ्यावरून ती खोटं बोलतेय हे स्पष्ट दिसून येत होतं. “तू अशा अवस्थेत माझी काय सेवा करणार?” त्यात काय एवढं. घरातली काम करायला नोकर माणसं आहेत की मी फक्त तुमच्या औषधपाण्याचं बघणार.
विकी तिच्या आयुष्यातून कायमचा नाहीसा झाला होता. पण आठवणी नाहीश्या होण्यासारख्या नसतात. त्या सतत आपल्या विचारांभोवती घोंगावत असतात. मायाचं बाहेरील जग हरवलं होतं जणू. आणि सहा महिन्याचा गर्भ घेऊन कुठे वावरावं तर लोक-लज्जेचा भाग होण्यासारखं होतं. ती स्वत:ला अंधाऱ्या खोलीत कोंडून घेत असे. त्या अंधाऱ्या खोलीत तिला सतत चार व्यक्तींचे विचार सतावत होते. डॅड, सलिल, विकी, आणि होणारं बाळ.
एके रात्री अचानक तिच्या डॅडच्या छातीत असह्य वेदना उठल्या आणि त्यातच त्यांचे निधन झाले. वडिलांच्या कार्याच्या दिवशी सगळी ओळखीतली, नात्यातली मंडळी येऊन मायला भेटून जात होती. एक एक जण सांत्वन करून निघुन जात होता. सगळं घर रिकामी झालं. आता फक्त एकटी मायाच घरात होती. घरात निरव शांतता पसरली होती. तिला सांभाळणारं, तिला आधार देणारं, तिला मायेनं जवळ घेणारं कुणीच नव्हतं. ती निराधार झाली होती. लहानपणापासूनच तिच्या वडिलांनी तिला कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नव्हती. तिच्या समोर तिच्या बालपणापासून ते आतापर्यंतच्या आठवणी फेर धरू लागल्या. एकटीच गुडघ्याला डोकं टेकवून रडत होती. सहज तिच्या मनात विचार आला. रडणारीही मीच, अश्रु पुसणारीही मीच आहे, मग हे व्यर्थ रडणं कुणासाठी आहे.
तिचे डोळे रडून रडून लाल झाले होते. पापण्या जड झाल्या होत्या. तिला अशक्तपणाही जाणवत होता. सांज झाली होती. सुर्य अजून मावळायचा होता.
खिडकीतून येणाऱ्या किरणांचा स्पर्श अंगाला जाणवत होता. तिने खिडकीतून बाहेर डोकावलं. तितक्यात एक काळ्या रंगाची मर्सिडीज तिच्या बंगल्याच्या गेटपाशी येऊन उभी राहिली. त्यातून एक व्यक्ती खाली उतरली. त्याने गाडी लॉक केली अन ती व्यक्ती गेटच्या दिशेने वळली.
त्या व्यक्तीच्या पर्संनॅलिटीने तो कुणीतरी रिच पर्सन वाटत होता. तो दारात येउन उभा राहिला. आपल्या डोळ्यांवरचा गॉगल त्याने डोकीवर चढवला. प्रथम त्या व्यक्तीला पाहून माया थक्कच झाली. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तिने त्याला दारातच मिठी मारली. आणि आर्त स्वरात साद घातली. सलिऽऽल! ती त्याच्या मिठीत ओक्साबोक्शी रडू लागली. कित्येक महिन्यांनी झालेला तिचा स्पर्श त्याला जाणवला. नकळत तो काहीसा सुखावला.
काही वेळाने मिठी सोडवत, “कंट्रोल युवर सेल्फ माया” म्हणत त्याने तिला मिठीतून दूर केले. तिनेही तिच्या भावनांवर आवर घालत त्याला घरात घेऊन गेली. त्याने तिच्या वडिलांच्या प्रतिमेच्या जवळ जाऊन हात जोडून आदरांजली वाहिली. त्याला नतमस्तक झालेलं पाहून तिच्या मनात एक विचारांची लहर उठली. किती फरक आहे सलिल आणि विकीच्यात. सलिलने आपलं बालपण फुटपाथवर काढूनही तो सुसंस्कृत आणि विकीला सगळ्या सुखसोयी मिळूनही तो विकृत. विकीने बाळाचा विचार न करता डिव्होर्स पेपरवर सह्या केल्या आणि लग्न म्हणजे बाहुला-बाहुलीचा खेळ नव्हे जो या डिव्होर्स पेपर्सवरच्या सह्यांनी मिटवला जाऊ शकतो असे सांगणारा सलिल.
खरंतर मायाला तिच्या अस्तित्वाची चीड आली होती. पण, प्रश्न एकटया जीवाचा नव्हता. सलिलने तिचे खांदे हलवून तिला विचारातून जागं केलं.
“माया कसला विचार करतेयस?”
“नाही सलिल... विचार करण्यासाठी काहीच उरलं नाही आता”.
का? असं का म्हणतेयस माया. बाळ आहे की तुझं.
तिने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. त्याने तिला जगण्याचा मार्ग गवसून दिला होता.
‘सॉरी माया मला तुझ्या वैयक्तिक प्रश्नांमध्ये घुटमळायचं नाही' सलिल आदरभावाने तिला म्हणाला. "तुझा पती घेईल की तुझी काळजी". "नो सलील हि गेव्ह मी डिव्होर्स अॅन्ड हि नॉट अॅकसेप्टेड हिज चाईल्ड". मायाचे असे उदगार ऐकून सलिल स्तब्धच झाला. त्याला कळतच नव्हतं काय बोलावं ते. एके काळी त्याने तिच्या वडिलांच्या हस्ते पारितोषिक स्विकारलं होतं त्याच भावनेनं तो त्यांना आदरांजली वहायला आला होता. तो क्षण त्याला आठवला आणि आता त्याच भल्या माणसाच्या मुलीची अवस्था दयनीय झालीय. याचा सलिल मनोमन विचार करीत होता.
सलिलला माया आपली सारी कहाणी ऐकवू लागली. सलिल निशब्धपणे ती ऐकत होता. खिडकीतून दिसणाऱ्या मावळत्या सुर्याकडे त्याची नजर खिळली होती. सुर्याने अगदी गंभीर रूप धारण केलं होतं. सलिललाही आता काहीतरी बोलावसं वाटत होतं.
माया तो सूर्य पाहतेस. वर्षानुवर्षे तो आपल्याच अग्नीत जळतोय. पण त्याने कधीच कोणाकडे तशी तक्रार केली नाही. माझंही तसंच आहे. माया, खरंच तू भाग्यवान आहेस. तुला तुझे आई - वडिलतरी माहित आहेत. मी तर ते पहिले सुद्धा नाहीत ते कसे असतात. त्यावेळी त्या सूर्याच्या पोटातल्या अग्नीपेक्षा माझ्या पोटात लागलेली भुकेची आग अधिक ज्वलंत होती. प्रेम तर मला कधीच कुणाकडून मिळालं नाही. म्हणूनच मला तुझ्या प्रेमाची किमंत कळली नाही.
चहाची किटली घेऊन अख्ख्या बाजारात फिरायचो. एकदा आठ आणे कमी आले म्हणून मला मालकाने मारलेले लाफे अजून मला माझ्या लाचारपणाची आठवण करून देतात. तू सहजमार्गी शिक्षण मिळवलंय माया. तेच शिक्षण घेण्यासाठी मी रात्रभर जागा राहत होतो. तेव्हा मला कळलं या साऱ्याच भेद खोलणारं एकच साधन आहे. तो म्हणजे पैसा आणि आज त्याच्यामुळेच मी तुझ्यापासुन दुरावलोय.
आज तो पैसा मी मिळवलाय. माझ्याजवळ आज अमाप पैसा आहे. पण, माझं बालपण मी मिळवू शकलो नाही. आणि आज तू तुझी हायक्लास सोसायटी हरवून बसलीस. आज माझ्या अंध विश्वासाची भिंत कोसळली आहे. आज माझं बालपण माझ्या समोर आलं आहे. आज तुझ्या गर्भाला एका नावाची गरज आहे. एक लक्षात ठेव माया आई-वडिलांची नावं नसलेली सगळीच सलिल होत नाहीत. याचा विचार कर. माझ्या घराचे दरवाजे अजून तुझ्यासाठी खुले आहेत आणि सलिल उठून दाराच्या दिशेने निघाला. असं वाटतं अजुन त्यांच्यातल्या पती-पत्नीच्या संबंधाचा, प्रेमाचा एक साल बाकी होता.
मधेच त्याने थांबून मायाकडे मान फिरवली आणि तो म्हणाला, एक सांगू माया, "मावळतीला सूर्यसुद्धा आपला रंग बदलतो. आपणतर माणसं...!”
समाप्त.
सुनिल संध्या कांबळी.
उमरखाडी, डोंगरी,
मुंबई – ४००००९.
9892289151
1 comment:
khup chaan aahe pan he tu swata lihil aahes ka?
ajachya paristithivar depend aahe kharach chaan aahe
Post a Comment