तुला काही आठवत असेल की नाही हे मला माहित नाही पण मला मात्र सारंकाही एखाद्या अपघाताप्रमाणे आयुष्यभर लक्षात राहील! ज्या दिवशी तू पहिल्यांदा माझ्या मैत्रिणीच्या घरी आलीस तेव्हा पासून ते तुझ्या लग्नापर्यंत प्रत्येक क्षणोणक्षण माझ्या लक्षात आहे.. तू फक्त सांग कोणता क्षण!
तुला हे माहित आहे का? एवढया सगळ्या कालावधीत मी तुझ्यासोबत एकूण अठ्ठावीस तास होतो पण हे अठ्ठावीस तास माझ्या जीवनातील पुढील अठ्ठावीस वर्षे हिरावून घेतील हे माहित नव्हतं.
तुला पुन्हा एकदा भेटावयास मनापासून वाटत होतं पण येणं एवढं सोपं नव्हतं. मुंबईच्या धक्काबुक्कीत, कामाच्या गडबडीत विसर पडत होता एवढं मात्र खरं! पण आठवण यायची. न जाणो कसं काय माझ्या दुर्दैवी नशिबाने तुला भेटण्याचा योगायोगा जुळवून आणला. माझ्या मालकाची नवीन कॉन्ट्रॅकटची सुरूवात तुझ्याच गावात व्हावी? काही का असेना तुला भेटण्याची संधी तर मला मिळाली. त्या दिवशी कामामधून वेळ काढून तुला भेटायला आलो. तुझ्या घराकडच्या तुमच्या आळीमध्ये लांबलचक मांडव उभारला होता. लांबून मुलांची धावपळ, बायकांचा गोंधळ, मांडवाला केलेली सजावट, वडिलधाऱ्यांनी मांडलेली बैठक, हे सगळं माझ्यासाठी नविनच होतं. जो तो आपली जबाबदारी दर्शवत होता. माझी नजर तुझ्या घराचा शोध घेतच होती. सगळेजण माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते. माझ्या पेहरावावरून मी अस्सल मुंबईकर दिसत होतो म्हणून एकाने मला विचारले, कोण हवंय तुम्हांला? मी म्हणालो, ... ... कुठे राहते माहित आहे का? इतक्यात त्यांच्या बरोबर असणाऱ्या चार – पाच मुलांनी तुझ्या घराकडे धाव मारली आणि तुझ्या दारात उभी राहून गोंधळ घालू लागली. ... ताई तुझा मुंबईचा मित्र आलाय. एखाद्या गावंढळ मुलीचा मुंबईशी काही संबंध येत नाही. त्यात मी तुझा मित्र म्हणून मला पहायला दारात तुझ्या मैत्रिणी जमल्या आणि सर्वात शेवटी तू माझ्या समोर येऊन उभी राहिलीस. तुझे ते हळदीमध्ये लिपलेले सौंदर्य पाहून मी पुर्णपणे भारावून गेलो. तुझ्याकडे पाहावं की तुझ्यासोबत बोलावं हेच सुचत नव्हते. नंतर हातातल्या हळकुंडाकडे लक्ष गेलं आणि लक्षात आलं की तो दिवस तुझ्या हळदीचा होता. पहिल्याच भेटीत सगळंकाही हरवून बसल्याने मी माझ्या प्रेमभावनांना मैत्रीचं लेबल लावून टाकलं.
त्या दिवशी तुझा आग्रह होता म्हणून ती रात्र मी तिकडेच थांबलो पण त्या रात्री तू मात्र निर्मळपणाने मला बरेचशे प्रश्न विचारत होतीस. एवढ्याश्या छोटया ओळखीतून तू पवित्र मैत्रीचं नातं जुळवलस. खरं सांगायचं तर तू माझ्यावर दाखवलेला विश्वास, माझ्याबद्दलची प्रेमभावना यामुळे मी पुर्णपणे भारावून गेलो होतो. ज्या प्रेमाची मी वाट पाहत होतो ते हेच पण नंतर आठवण झाली की हे आता थोडया वेळा पुरतंच आहे आणि काही वेळाने मला माझ्या पूर्वस्थितीत जायचं आहे. एक गोष्ट मात्र मी अभ्यासत होतो, तुला माझ्याबद्दल वाटणाऱ्या आपुलकीबाबत बरेचसे प्रश्न तुझ्या नातेवाईकांत उठत होते. असो, पण मला एवढंच वाटत होतं की माझ्यामुळे तुझ्या आनंदकार्यात विघ्न नको. पुढची सकाळ हि माझ्यासाठी काळरात्र ठरणार होती हे मला ठाऊक होतं पण तुझ्या आनंदात मी माझे सर्व दुख विसरून लग्न मांडवात हजर झालो. तुझ्या शुभकार्यात माझाही हातभार लागावा हिच इच्छा उरली होती.
सगळी कार्ये पार पडली आणि अखेरची वेळ होती ती गाठीभेटीची. तुझ्या डोळ्यांमध्ये दाटलेले अश्रुमोती पाहून त्यातील प्रत्येक अश्रु आपल्या ओंजळीत घेवून आपल्या आठवणींच्या बटव्यात जमा करावेत असं वाटत होतं आणि जेव्हा तू माझ्या दिशेने वळलीस तेव्हा मात्र माझ्यात काहीच त्राण उरला नव्हता. संपूर्ण शरीर एखाद्या झाडावरील फुले उन्मळून पडल्यासारखं. मग ठरवलं आणि पुन्हा कोणासोबत जवळीक न करण्याचा निर्धार केला. तीच तुझी आणि माझी शेवटची भेट.
- सुनिल संध्या कांबळी.
1 comment:
mastach ........ shevat khup touchy hota ...
Post a Comment