लायब्ररी



हरी ओम कविवर्य..

हरी ओम, हरी ओम.. बाबा आज फार उशिर झाला तुम्हांला. मी कवितेची पाने जुळवतच विचारलं. त्यांनी हाताच्या मनगटावरची कापडी पिशवीचे बन पुढे सरकावले आणि पिशवी खुर्चीच्या मागे एका कोनाला अडकवली.

हो आज जरा उशीरच झाला. मार्केटला गेलो होतो, तिथूनच मारुतीचं दर्शन घेवून आलो.

मी मान खाली घालून आपल्या कामात मग्न होतो. बाबांच्या बोलण्याला होकार ऊकार तेवढे देत होतो. क्षणभर ते खुर्चीवर शांत बसले. त्यांनी आपल्या पिशवीतून निळसर रंगाचं पुस्तक काढलं. जपमाळ काढली त्या पुस्तकावर असणाऱ्या प्रतिमेस त्यांनी मनपुर्वक नमस्कार केला आणि एक एक मणी अंगठ्याने मागे सरकवत जप करीत राहिले. वातावरण पुन्हा निशब्द झालं.

मध्येच दारातून मोठयाने आवाज झाला नमस्कार.. नमस्कार... काय भाऊ, ओऽऽ लेखक..

मी नजर वर केली.

बाबांच्या तोंडात पान असल्यामुळे ओठ दाबून त्यांनी फक्त मान हलवली.

एखादा नेता प्रेस कॉन्फरेंसला भेट दयायला येतो त्याप्रमाणे सुर्वे आत आले.

आमच्यापैकी कोणीच त्यांच्या बोलण्याकडे वळले नाही.

त्यांनी टेबलावरील पेपर चाळण्यास सुरूवात केली. कोणच लक्ष देत नाही म्हणून पेपर घेऊन खुर्चीत जावून बसले. खेडेगावात भीषण अपघात, मुंबईत चार लाखांचा दरोडा, प्रियकराची गळफास लावून आत्महत्या.. मोठया आवाजात पेपरच्या हेडिंग्स वाचू लागले.

हा पेपर ते स्वत:साठी वाचत होते की आम्हांला या बातम्या माहित आहेत का नाहीत हे तपासत होते असा माझ्या मनात सहजच एक विचार आला. मधेच वाचता वाचता ते एखादा विनोद झाल्यासारखं स्वत:च एकटेच हसत. मधेच पेपर डोळ्यांच्या काटकोनातून आणून आमच्याकडे पाहत आणि माझ्याकडे कुणाचं लक्ष आहे का नाही असा तर्क स्वत:च काढत.

काय ओ सुर्वे का हसताय? मीच त्यांना असा प्रश्न विचारला पण समोरून काहीच रिस्पॉन्स आला नाही. पुन्हा पेपरमध्ये डोकं खुपसून काहीतरी वाचल्यासारखं केलं आणि ‘केशवाऽऽ माधवाऽऽ’ भूपाळी गाऊ लागले. पुन्हा डोळ्यांच्या कोनांमधून पाहू लागले. अगदी गळ्याच्या शिरा ताणून गाऊ लागले, “तुझ्याऽऽ नामाऽऽ त रे गोडवाऽऽ”, तरीही आमच्या दोघांचं त्यांच्याकडे दुर्लक्षच.

अखेर बाबांची तपस्या संपली. हातातली जपमाळ आणि पुस्तक पुन्हा पिशवीत गेलं.

काय सुर्वे, आज एकटेच? बाबांनी विचारलं.

“हो काय करणार! आमचे सोबती परवाच गावी गेलेत”, सुर्वे पेपरची घडी घालत उत्तरले.

काय भाई गावी गेलेत? तरीच दोन दिवस झाले आले नाहीत, बाबांनी काळजीत विचारलं. मग काय वाचलात पेपर?

तर आम्ही काय करणार! तुम्ही जप करण्यात मग्न होता आणि ते साहेब तिकडे कसलीतरी कागद चाळण्यात बिझी आहेत म्हणून पेपराशीच बोलत होतो, सुर्व्यांनी लगेच आमची कानपिळी केली.

अरे याऽऽ.. याऽऽ.. बसाऽऽ.. बसाऽऽ..
नमस्कार भाऊ, नमस्कार सुर्वे, काय साहेब लक्ष आहे का?
बाबांचं आपलं सगळ्यांनाच “हरी ओम”.
याऽऽ याऽऽ नमस्कार मी म्हणालो. मी लिहत असलो तरी माझं लक्ष असतं ते हि चारी बाजूंना आणि पुन्हा मान खाली घातली.
साहेब बिझी आहेत त्यांना डिस्टर्ब करू नका”, सुर्व्यांनी हळूच भाईनां खुणवलं.

भाई म्हणजे रिटायर्ड ऑफिसर. त्यांची नमस्काराची पद्धत म्हणजे एखाद्या चहाच्या हॉटेलात लंच टाईममध्ये भेटायला येणाऱ्या मंडळींसारखी. बाबा, भाई, सुर्वे तशी हि तिन्ही मंडळी रिटायर्डच पण त्यांच्यात असणारी चौथी व्यक्ती म्हणजे “मी”. हो मीच तो यांचा “साहेब”, “कविवर्य”, “लेखक” आणि “बेरोजगार कम रिटायर्ड”.

येऽऽ.. येऽऽ.. तू हि आलीस का, क्लास नाही वाटतं तुझा आज? बाबांनी विचारलं.

हो आज कंटाळा आला, तोंड वाकडं करत तिने उत्तर दिलं. तसं हिला सतत आळसाने पछाडलेलं. सहज हिला चालतानाही कुणीही हरवेल. आवड मात्र भारी.. सगळ्या गोष्टींची. रस्त्यात रश्मी भेटली, तिने पुस्तकं दिलीत ती ठेवायला आले.
काय रे अजुन तू इथेच? कॉलेजमधून डायरेक्ट इथेच आलास वाटतं? मस्करीत पण खडसावून विचारलं. हा तिच्यातला एक गुणच आहे.

हो हि आम्हां रिटायर्ड मंडळींची विश्रांतीगृहाची म्हणजेच आमच्या लायब्ररीची (मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय) ची सर्वेसर्वा “शर्मिला”. बाबांची मुलगी “शमा”. शमा ताई हिच्या “शर्मिला” नावावर जाऊ नका. ते तिला भेटाल तेव्हाच कळेल. आमच्या लायब्ररीच्या कॅम्पसमध्ये हिचा फार दरारा आहे. त्यामुळे “शमा” हे नावच शोभून आहे. स्वभावाने भांडखोर, कोणत्याही विषयावर गॉसिप करणे हा तिचा छंदच. तशी प्रेमळही आहे पण आतूनच कधी दाखवून देत नाही. लता मंगेशकरचं भूत तिच्या डोक्यावर आहे म्हणून साधी राहणीमान, बाकीचं तिला भेटल्यानंतर कळेलच.

कुठे निघालीस? मी विचारलं.

घरी जातेय, माझी पोरं वाट बघत असतील. लायब्ररीवर लक्ष ठेव, सभासदांना पुस्तक काढून दे, कोण नवीन सभासद व्हायला आलं तर करून घे, कोणाची फी बाकी राहिली असेल तर ती सुद्धा घे आणि ती गळ्याचा सूर चढवत “यारा सिली सिली” म्हणत निघून गेली.

लायब्ररीचा पुरेपुर वापर करून घेणारा मीच. घरच्यापेक्षा अधिक वेळ मी लायब्ररीतच काढतो. तिचा तसा माझ्यावर विश्वासही आहे तसं नसतं तर लायब्ररीच्या वेळेव्यतिरिक्त वेळेत तिने मला लायब्ररीची किल्ली दिली नसती.

तू थांबणार आहेस? बाबांनी विचारलं.

“हो थोडा अभ्यास बाकी आहे, तुम्ही या” मी म्हणालो.

सुर्वे आणि भाई कधीच गेले, तुला आवाज दिला त्यांनी लक्ष नव्हतं तुझं पुन्हा. त्यांना डोंगरावर जायला अंधार पडेल. बाबांनी मनगटाला पिशवी अडकवली, चल ‘हरी ओम’.
हो ‘हरी ओम’, मी म्हणालो.          

लायब्ररी शांत झाली.

तसा मी त्यांच्या नातवाच्या वयाचा पण त्यांच्यात मिसळून गेलो. मी जेव्हा लायब्ररीत प्रवेश घेतला तेव्हा लायब्ररीची अवस्था अगदी दयनीय होती. ते दृश्य पाहुन मी थक्क झालो. मला वाटत होतं, इथं लोकं कशी वाचायला बसत असतील. तिथल्या धुळीमुळे एकाही पुस्तकाला हात लावायची इच्छा झाली नाही. काही दिवस मी ही पुस्तक घरीच घेवून जात होतो पण मी लायब्ररीत प्रवेश घेतला होता तो वाचनासाठी नव्हे तर मला अभ्यास करण्यासाठी. तेव्हा मी ठरवलं लायब्ररी साफ करायची. ताईला हाताशी घेवून पहिल्यांदा टाकाऊ वस्तू टिकावू केल्या. भंगाराच्या वस्तु बाजुला केल्या. पुस्तकांवरची धुळ उडवली. ते पाहुन ताईलाही थोडं बरं वाटलं. तेव्हापासूनच मी लायब्ररीचा खरा सभासद झालो.

हायऽऽ.. हॅलोऽऽ.. जेंटलमनसारखे एकदम दरवाज्यातून आत आले. मी ही त्यांना त्यांच्याच पद्धतीत उत्तर दिलं. सुभाष मयेकर लायब्ररीला धावती भेट देणारे सभासद. खांद्याला अडकवलेल्या काळ्या रंगाच्या ऑफिस बॅगेमधून त्यांनी घाई घाईने दोन पुस्तकं बाहेर काढली. पुस्तकांच्या रॅकमधुन पुस्तकं इकडे तिकडे केली. बघितलं न बघितलं एक पुस्तक काढलं. इंट्री करता का? त्यांनी मला विचारलं.
“हो देतो करून” मी.
धिस इज अ बेस्ट बुक.
हो का! मी.
स्टोरी इतकी छान लिहिलीय, ती तुम्ही वाचून बघाच इज द बेस्ट. मयेकरांनी अगदी ठामपणे सांगितलं.
“हो वेळ मिळाला तर नक्की वाचेन” मी म्हणालो. वाचनासाठी वेळ देण्याइतका वेळ माझ्याजवळ नसतोच तर ह्याचं पुस्तक कुठे वाचत बसू.. मनातच म्हणालो.

त्यांनी कार्डावर सही केली. अच्छा थॅक्स, ओके, बाय. ते खांद्याला बॅग अडकवत जसे घाई घाईने आले होते तसेच घाई घाईने निघूनही गेले.

बराच वेळ अभ्यास करत होतो त्यामुळे डोकं अगदी जड झाल्यासारखं वाटत होतं. मी थोडंस मागे सरकून खुर्चीला डोकं टेकून डोळे मिटून पडून राहिलो. वाटलं थोडा आराम मिळेल. कसलं काय मेंदुचं विचार करण्याचं काम चालूच होतं. दहा मिनिटं झाली असतील डोळे मिटलेल्याला मधूनच घोगरा आवाज आला.

ओ हे पुस्तक घेवून जातो आणि आणलेलं पुस्तक तिकडे टेबलावर ठेवलंय.

त्यांनी हाक मारल्याने मी डोळे उघडले. मीही त्यांना ठिक आहे असं म्हणालो.
हे आता बाहेर पडले ते आमचे जुने सभासद ‘विश्वास पाटील’. भाऊच्या धक्क्यावर मच्छीचा धंदा करतात. तिकडे फार ओरडावं लागतं म्हणतात म्हणूनच त्यांचा आवाज असा आहे. तसे हे नेहमीच येतात, आणलेलं पुस्तक ठेवतात, हवं असलेलं पुस्तक घेवून जातात. वेळ असला तर बसतातही बोलत. नेहमी येतात म्हणून त्यांची कार्डवर नोंद होत नाही पण मी कधीतरी करतो. तसे सगळेच नेहमी येतात, कामात असलो तर मग असंच घेवून जा सांगतो.

मी पुन्हा टेबलावर डोकं ठेवून पडून राहिलो. विचार सत्र चालूच होतं. बरेच दिवस बाबा विचारत असतात त्या दोन मुली आल्या नाहीत. काय बरं नाव अ... हो आठवलं. हो त्या तिकडे कुठे नाना चौकात राहतात. कामावरून सुटल्या की येतात इकडे आठवडयातून एकदा केव्हातरी, बहुतकरून शनिवारचे येतात. पुन्हा त्या जे.जे. मधल्या रश्मी पाडावे बाई कित्येक दिवस आल्या नाही. त्याचं एक वाचन म्हणजे भयंकर. एकदा का त्या वाचायला लागल्या की दोन तीन पुस्तकं एकदम घेवून जातात आणि लगेचच दोन दिवसांत आणूनही देतात. कसं काय जमतं यांना जलदगती वाचन कोणास ठाऊक.

साब आज देर तक बैठे हो! शाळेचा वॉचमन दरवाज्याचा हॅन्डल ढकलत पुढे आत आला.

हा यार तीन तारीख को एग्जाम है! उसी की तैयारी चल रही है! थोडी देर मे निकलुंगा. एग्जामचं नाव ऐकताच तो तिथून निघून गेला. हा काश्मीरमधून आलेला नोकरीसाठी. अंगाखांद्याने असल्याने लगेचच सिक्युरिटीमध्ये लागला. साधारणत माझ्याच वयाचा असल्याने आमच्या दोघांचं पटत होतं पण बरं झालं त्याने हाक मारली ती नाहीतर कार्डवरचे सगळेच सभासद टेबलासमोर येवून उभे राहिले असते माझ्या विचारांच्या धुंदीत...

- सुनिल संध्या कांबळी.

No comments: