निखारे



शब्दांच्या पलीकडे जाऊन बोलण्याचा प्रयत्न मी कित्येकदा केला, पण... माझ्या अनामिक विचारांनी अशी का खेळी केली की मी माझं अस्तित्वच हरवून बसलो. माझ्या जीवनाची अधोरेखित कहाणी मीच लिहिली आणि, आज पुन्हा तिच पाने वाऱ्याने उलटून पुन्हा प्रस्तावनेवर येऊन थांबली आहेत. आज गुरफुटून जाण्यासारखं काहीच नाही पण ज्या प्रश्नांच्या शोधात मी अविरत फिरत होतो आज तिच मला प्रश्ने विचारतायत... तुझी हरवलेली अनामिक नाती कुठेत? तुझी ऋणानुबंध कुठेत? मंद हवेच्या झुळूकीत स्मितहास्य फुलविणारी फुले कुठेत...?

हो आज नि:शब्द राहण्याशिवाय माझ्याजवळ काहीच नाही. माझं आयुष्य आज मनोहर रणपिसे यांच्या ओळीप्रमाणे होऊन बसलंय...

कापराचा देह माझा
विरह अग्नीने जळे...
काळजाच्या आत माझ्या
शुभ्र कमळाचे तळे...

आज पुन्हा वाटतय माझं सर्वस्व मला पुन्हा हवंय... विरलेलं संचित पुन्हा जोडायचयं...

मन माझे,
तुफान वारा...
अश्रु माझे,
पाऊस-धारा...

नेहमी तळपणारा सुर्य आज कुठेतरी विसावतोय... माझं एक पर्व तर कधीच संपलंय, कधी दरवळून जाईन या सृष्टीत माहित नाही...

समजलात तर मी विचार आहे,
मानलात तर मी प्रेम आहे,
अनुभवलीत तर मी साथ आहे,
बरसलो तर मी रुद्र आहे...

अनुभवांच्या निखाऱ्यांवर चालणारा हा रुद्र आज... फक्त अनुभव बनून राहिलाय. आता वेळ आली आहे भावनांना सत्यात उतरविण्याची, पेरलेलं उगवायची... अन् उगवलेलं उपभोगायची...

- सुनिल संध्या कांबळी.