साहेब





सर्वत्र पसरलेली बातमी ऐकूण मन अगदी बैचेन होत होतं. मनोमन वाटत होतं ती अफवा असावी. वाटत होतं लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. डोळ्यांसमोर त्यांचा चेहरा खिळून राहिला होता. सहजासहजी विश्वास ठेवणे सोपे जात नव्हते. माझं मन अगदी उन्मळून पडलं होतं. त्या रात्री झोप लागता लागत नव्हती. डोळे मिटले तरी तेच, उघडले तरीही तेच. डोक्यात विचारांनी धुमाकुळ माजवला होता. अधून मधून कानावर समाधानकारक बातम्या येत होत्या. मी काहीसा सुखावत होतो. काही क्षणांसाठी थांबलेलं जनजीवन पुन्हा सुरु झालं. काही वेळाने माझं अशांत मन पुन्हा भवितव्याच्या दिशेने वळू लागलंकाही काळ उलटला असेल स्वत:ला सावरतो न सावरतो पुन्हा एकदा वादळ उठलं आणि अखेर
एका महामानव, महासागर, महाराष्ट्रीय, महायोगी, महापुरुष, मराठी अस्मितेचा तारणहार, युगपुरुष, लढवय्या, साहेब, सेनापती, ढाण्या वाघ, हिंदूंचा वाली, कलाकार, पत्रकार, संपादक, व्यंगचित्रकार, मित्र, एक योध्दा अशा अनेक तळपत्या उपाध्यांनी सन्मानित आदरणीय असलेल्या सुर्याचा अस्त झाला.

बातमी ऐकताच मन अगदी सुन्न झालं. डोळ्यात उभे राहिलेले अश्रू डोळ्यातच ओसरून गेले. निशब्द ओठ, स्तब्ध हृदय, सुन्न मन, चेहरयावर दाटलेली उदासीनता घेऊन मी घरी निघालो. रस्त्याने चालताना वातावरणात पसरलेली गांभीर्यता जाणवत होती. सर्वांच्याच चेहरयावर एक प्रकारच सावट आलं होतं. जो तो आपापल्या विचारात पावलं उचलत होता. कुणाला घरी जायची घाई होती तर कुणी आपल्या दुकानाची आवराआवर करीत होता. त्या दिवसात हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा दिपोत्सवाचा सण असूनही त्यांच्या चाहत्यांनी आपापल्या दारातील दिवे विझवून टाकले. कित्येक दिवस काहींना फराळही गोड लागत नव्ह्ता. जो तो आपापल्या परीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत होता. सर्वत्र एकच विषय पसरला होता … साहेब…  साहेब आणि  फक्त साहेब …

हातगाडी ओढणारा हमाल असो वा मोटारीतून जाणारा मालक असो, कित्येक उद्योजक, उद्योगपती, कलाकार, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, नेते मंडळी, कामगार वर्ग, तरुण वर्ग, मित्र मंडळीमध्ये त्यांचा वचक असायचा. अगदी शाळेत जाणारया विद्यार्थ्यांमध्ये विचार बनून, वृद्धांमध्ये त्यांचा आधार बनून, तरुणांमध्ये सळसळत रक्त बनून, उद्योजकांचा वाली बनून, खेळाडूंचा मित्र बनून, कलाकाराची आवड बनून आणि राजकारणाचा एकटा टायगर बनून अविरत वावरत असायचे. भाषेचा, रेषेचा आणि दिशेचा पुरेपूर उपयोग करणारा एक जादुगार.

अगदी तळागाळापासून ते उच्चभ्रू लोकांपर्यंत त्यांना रोखण्याची कुणात टाप नव्हती. तो असे त्यांना उद्देशून बोलण्याची कुणात हिंमत नव्हती. इतरांवर बोट रोखून फक्त त्यांनीच बोलावं आणि आम्ही त्यांच्या मागून अरेss  आवाजss  कुणाचा ….  म्हणावं इतकंचजणू काही आमच्यात भगवं रक्तच सळसळत होतं.

गेली चार दशके ज्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं, महाराष्ट्रातल्या जनतेवर असीम प्रेम केलं, मराठी भाषेशी नातं जपलं तोच सोबत सैनिकांचा ताफा घेवून चालणारा वीर आज काळाआड निघून गेला. संपुर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं भगवं  रक्त आज थेंब थेंब सांडत शिवतीर्थाच्या दिशेने पोहचत होतं. जिवंतपणी विक्रम करता येतात माहित आहे पण त्यांच्या अंत्ययात्रेतूनहि त्यांनी दाखवून दिलं

दुसरया दिवशीच्या वृत्तपत्रांची सर्वच पाने त्यांच्या आठवणींनी भरून गेली. आठवण म्हणून सांगतोत्यातील एका वृत्तपत्रातील कवितेच्या काही ओळी मी वाचल्या

यमलोकी आज   ...  साजरी दिवाळी
पूजेसाठी आमुचा …  चोरला विठ्ठल
रेडयाला भीती   …   कायमची आता ...
यमलोकी सुरु       …   वाघाचा वावर

आता जपण्यासारख्या राहिल्या आहेत तर त्या फक्त त्यांच्या आठवणी आणि त्यांचा इतिहास

-
सुनील संध्या कांबळी. 

No comments: